नागपूर : इतर मागासवर्गीयांच्या कोट्यातून आरक्षण दिले जावे या मागणीसाठी अखिल भारतीय मराठा महासंघ दिल्लीत २५ जुलैला एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करणार आहे. अखिल भारतीय मराठा महासंघ १२३ वर्षांची समाजकार्य करणारी सामाजिक संघटना आहे. महाराष्ट्रासह देशाच्या विविध भागांत वास्तव्यास असलेल्या मराठा समाजासाठी महासंघ कार्यरत आहे.
मराठा आरक्षणाचा मुद्दा १९८१ साली अखिल भारतीय मराठा महासंघाने प्रथम ऐरणीवर आणला होता. तेव्हापासून २०१८ मध्ये मराठा क्रांती मोर्चे निघेपर्यंत यासाठी महासंघाने मोर्चे, रास्ता रोखो, परिसवांद अशी विविध आंदोलने केली. परंतु आरक्षणाची मुळ मागणी अध्यापही प्रलंबित आहे.
हेही वाचा – वर्धा : ‘डिस्पोजल हटवा, पर्यावरण वाचवा’, गृहिणींची अनोखी पर्यावरणप्रेमी चळवळ
महासंघाने महाराष्ट्र सरकारकडे सारखा पाठपुरावा केला असता सरकार ५० टक्क्यांच्या आत व ओबीसीमधून आरक्षण देण्यास असमर्थ दिसत आहे. त्यामुळे घटनेत बदल करून ५० टक्क्यांच्यावर ओबीसीमधूनच आरक्षण द्यावे या मागणीसाठी मराठा महासंघ दिल्लीत जंतर मंतरवरील २५ जुलैला एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करणार आहे. यानिमित्त महासंघाच्या नागपूर महानगर शाखेची नुकतीच एक बैठक झाली. त्यात हजारोंच्या संख्येने दिल्लीतील आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन मराठा समाजाला करण्यात आले.