लोकसत्ता टीम

गोंदिया : अगदी जवळचे नातेवाईकांच्या घरी लग्न, पुणे मुंबई येथील कुटुंबातील लग्न, मुलांना शाळेच्या उन्हाळ्याच्या सुटीमध्ये फिरायचा बेत आखलेल्या हौशी प्रवाशांनी तीन महिने आधीच आरक्षण करून ठेवल्याने गोंदिया स्थानकावरून देशाच्या विविध भागांत जाणाऱ्या बहुतांश रेल्वेंचे आरक्षण “हाऊसफुल” झाले आहे.

द्वितीय श्रेणी शयनयान पासून ते प्रथमश्रेणी वातानुकूलित डब्यांची वेटिंग लिस्ट मोठी असल्याने तिकिटांचे आरक्षण करिता जाणाऱ्या अनेकांच्या पदरी निराशाच येत आहे. गोंदिया हे हावडा-मुंबई मार्गावरील महत्त्वाचे जंक्शन असल्याने दररोज अनेक गाड्यांची ये-जा सुरू असते.

हावडा-मुंबई या महत्त्वाच्या लोहमार्गावर असल्याने गोंदिया हे व्यस्त स्थानक असून, दररोज हजारो प्रवाशांचा राबता असतो. आगामी लग्नसराईचे दिवस व उन्हाळ्यातील सुट्यांमुळे अनेकांनी आधी पासूनच नियोजन करून रेल्वे तिकिटांचे आगाऊ बुकिंग करून ठेवले आहे.

त्यामुळे गोंदिया स्थानकावरून जाणाऱ्या विदर्भ एक्स्प्रेस, महाराष्ट्र एक्स्प्रेस, गीतांजली एक्स्प्रेस, पुणे हावडा यांसारख्या मुंबई-हावडा मार्गावरील गाड्यांची प्रतीक्षा यादी मोठी असल्याचे रेल्वेच्या अधिकृत संकेत स्थळा वरून दिसून येत आहे. या सोबतच दक्षिण भारता कडे जाणाऱ्या गाड्यां मध्येही आरक्षण फुल्ल झाले आहे.

सर्वाधिक गर्दी मुंबई पुणे मार्गावर

गोंदिया हे मुंबई-हावडा लोहमार्गा वरील महत्त्वाचे रेल्वेस्थानक आहे. देशातील सर्वच ठिकाणी जाण्यासाठी येथून रेल्वे उपलब्ध असल्यामुळे प्रवाशांची मोठी गर्दी असते. पुणे मुंबई कडे जाणाऱ्या गाड्यांमध्ये विशेष गर्दी असल्याचे चित्र दररोज बघायला मिळत आहे.

काय म्हणतात अधिकारी?

दरवर्षी उन्हाळ्यात रेल्वेचे आरक्षण फुल्ल असते. १२० दिवस आधी बुकिंग करण्याची सुविधा असल्याने अनेक प्रवासी आधीच सीट आरक्षित करतात. प्रवाशांची अतिरिक्त गर्दी पाहता, रेल्वेकडून उन्हाळी विशेष गाड्याही चालविण्यात येतात, असे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

६ दिवसांचे नॉन-इंटरलॉकिंग

चक्रधरपूर विभागातील राउरकेला केबिन स्थानकांवर पायाभूत सुविधांच्या विकासासाठी २३ ते २६ एप्रिल २०२५ या कालावधीत ६ दिवसांचे नॉन-इंटरलॉकिंग कार्य केले जात आहे. त्यामुळे दक्षिण पूर्व मध्य नागपूर विभागा तून धावणारी ट्रेन टाटा- नेताजी सुभाषचंद्र बोस इतवारी- टाटा ही गाडी २५ आणि २६ एप्रिल २०२५ रोजी असे दोन दिवस रद्द करण्यात आली असल्याची माहिती द.पू.म. रेल्वेचे वाणिज्य व्यवस्थापक दिलीप सिंग यांनी पत्रका द्वारे दिली आहे.