नागपूर : प्रतापनगर चौक ते ऑरेंज सिटी रोड (सोमलवार शाळा) सिमेंट काँक्रिटच्या रस्त्याचे काम अतिशय संथगतीने सुरू आहे. अर्धवट बांधलेल्या रस्त्यावरून वाहतूक सुरू करून अपघातास आमंत्रण मिळत आहे. दुसऱ्या बाजूचा रस्त्याचे काम पूर्ण करावे, तोपर्यंत अर्धवट रस्त्यावरून दुसऱ्या बाजूच्या रस्त्यावर जाण्यास मज्जाव करण्यात यावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दक्षिण-पश्चिम नागपूर मतदारसंघातील राणाप्रतापनगर, टेलिकॉम नगर, रामकृष्ण नगर, अशोक कॉलनी आणि त्रिशरण नगर या भागातील नागरिकांना अपूर्ण रस्त्याचे काम व बेशिस्त बांधकामामुळे त्रासदायक ठरत आहे. नागपूर महापालिकेने मार्च २०२४ रोजी या सिमेंट रस्त्याच्या कामाचे कार्यादेश दिले.
सिमेंट रस्त्याचे कंत्राटदार केसीसीकडे आहे. या कंपनीने फेब्रुवारी २०२५ पर्यंत ऑरेंज सिटी रोड ते प्रतापनगर चौकापर्यंत एका बाजूच्या रस्त्याचे काम पूर्ण केले. आता दुसऱ्या बाजूचे अर्धे काम पूर्ण झाले आणि त्यावरून वाहतूक सुरू देखील केली आहे. दुसऱ्या बाजूची वाहतूक दुचाकी चालकांना धोकादायक ठरत आहे. एवढेच नव्हेतर नागरिकांना धुळीचा त्रास देखील सहन करावा लागत आहे.
काही वाहने एका बाजूने तर काही वाहने दोन्ही बाजूने काढण्यात येत आहेत. अर्धवट बांधलेल्या सिमेंट रस्त्यावरून पूर्ण झालेल्या दुसऱ्या बाजूच्या रस्त्यावर वाहन नेताना मोठी अडचण निर्माण होत आहे. पूर्ण झालेल्या सिमेंट रस्त्यावरून येणारी वाहने भरधाव येतात. तर दुसऱ्या बाजूच्या अर्धवट बांधकाम झालेल्या रस्त्यावरून येणाऱ्या वाहनांचा अपघात होत आहे. शिवाय एका बाजूकडून दुसऱ्या बाजूला वाहने नेताना अपघात होत असल्याचे दिसून येत आहे.
नागरिकांची मागणी
सर्व दगडी धूळ स्वच्छ करावी आणि रस्त्यावरील बांधकाम साहित्य ताबोडतोब बाजूला करावे. धुळीचे प्रदूषण कमी करण्यासाठी नियमितपणे पाणी शिंपडावे. अर्धवट बांधकाम झालेल्या रस्त्यावरून बाजूच्या रस्त्यावर वाहने नेण्यास मज्जाव करण्यात यावा. पूर्ण झालेल्या एका बाजूच्या रस्त्यावर कठडे लावून दोन्ही बाजूची वाहतूक सुरू करावी. सोमलवार शाळेजवळील उर्वरित सिमेंट रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करावे, अशी मागणी नागरिक करत आहेत.
वारंवार होणारे अपघात
सोमलवार शाळेशेजारील एका वसाहतीजवळ एका पुलाचे काम आता सुरू झाले आहे. तरी त्या मार्गावरील वाहतूक सुरू ठेवण्यात आली आहे. तसेच रस्त्यावर बांधकाम आणलेली अनेक अवजड साहित्य, वाहने उभी आहेत. ट्रक आणि बुलडोझरसह बांधकाम साहित्य आणि अवजड वाहनांमुळे गर्दी होते आणि गोंधळात भर पडते. बरीच शाळेकरी मुले सायकलने ये-जा करतात. हे सर्व त्यांच्यासाठी धोकादायक आहे. याशिवाय सिमेंट रस्त्यालगत अनेक उंच इमारतीचे बांधकाम सुरू आहे. त्यांच्या बांधकाम साहित्यामुळे धूळ व अपघाताचा प्रश्न चिघळला आहे.