नागपूर : चिटणीस चौकातून दंगलीला सुरुवात झाली. या चौकाला लागूनच भालदारपुरा ही मुस्मील बहुल वस्ती आहे. या वस्तीची लोकसंख्या आणि दंगलीपूर्वी सोमवारी सायंकाळी एकत्र आले युवकांची संख्या याचा ताळमेळ जुळत नाही. येथे कामठी, टेकानाका आणि मोमीनपुरा येथून लोक आले होते, असे भालदरा येथील नागरिकांनी सांगितले.

बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी ‘आयत’ असलेली हिरव्या रंगाची चादर दुपारी १२ च्या सुमारास जाळली. गणेशपेठ पोलिसांकडे चादर जाळण्यांविरुद्ध कारवाईची मागणी करण्यात आली. दिवसभर कोणाविरुद्ध कारवाई झाली नाही.चादर जाळण्याची चित्रफित समाजमाध्यमावर दिवसभर फिरत, सोबतच प्रशासन कोणाविरुद्ध कारवाई करण्यास तयार नाही हे देखील समाजमाध्यावर सांगण्यात येत होते. समाजातील जहाल गट आक्रमक झाला आणि वेगवेगळ्या भागातील युवक चिटणीसपुरा चौकात एकत्र आले. पोलिसांना युवक जाब विचार करून लागले आणि त्यानंतर त्यांच्यापैकी एकाने पोलिसांवर दगड भिरकावला. त्यानंतर दंगल भडकली, असा घटनाक्रम भालदपुरा येथील शेख अब्रार यांनी सांगितला.

युवकांना गोळा करण्यात कोणाचे हात?

चिटणीसपुरा चौकात कामठी, टेकानाका, मोमीनपुरा, कबसाबपुरा येथील युवक मोठ्या संख्येने आले होते. भालदारपुमधील युवकांची संख्या कमी होती. येथे मोठ्या संख्येने युवक कसे काय जमा झाले. त्यांना इकडे येण्यास कोणी मदत केली, याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी येथील नागरिकांनी केली.

इक्बाल डेकोरेशनमध्ये कोलकाताचे मजूर

महाल परिसरात झालेल्या दंगलीत परप्रांतिय युवक नव्हते. इक्बाल डेकोरेशनमध्ये कोलकाताचे १२ ते १४ मजूर काम करतात. त्यांच्या राहण्याची सोय भालदरा येथे आहे. ते अधूनमधून, सणासुदीला कोलकात्याला जात असतात. त्यामुळे परप्रांतिय युवक दंगलीत होत म्हणणे चुकीचे आहे, असेही भालदरापुरा येथील नागरिकांचे म्हणणे आहे.

उपराजधानीत १९९२ नंतर दंगल

शुल्लक घटना वगळता शहरात हिंदू-मुस्लीम एकोप्याने राहत आले आहे. शहरातील १९९२ ला दंगल झाली होती. त्यानंतर कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही. केंद्र, राज्य सरकारने औरंगजेबच्या कबरीच्या काय करायचे ते करावे. पण, अन्य धर्मियांच्या भावनांचा अनादर करायला नको. प्रशासनाने चादर जाळण्यावर वेळेत कारवाई केली असती तर ही घटना टाळली असती, अशी प्रतिक्रिया भालदारपुरा येथील एका वयोवृद्ध मुस्लीम नागरिकांची होती.