लोकसत्ता टीम
नागपूर : वर्धा मार्गावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतुकीत बदल करीत ‘नो राईट टर्न’ उपक्रम सुरु करण्यात आला. मात्र, या बदलामुळे वाहतूक कोंडीत अधिक भर पडली. पोलीस उपायुक्तांच्या या अफलातून प्रयोगामुळे नागपूरकर हैराण झाले आहेत. अनेक वाहनचालकांनी नव्या प्रयोगावर नाराजी व्यक्त केली असून वर्धा मार्गावरील वाहतुकीची कोंडी लक्षात घेता वाहतूक शाखेचे नवनियुक्त पोलीस उपायुक्त अर्चित चांडक यांनी यापूर्वी २३ ते २८ सप्टेंबर या कालावधीसाठी मॉरेस टी पॉईंट ते कृपलानी चौक यादरम्यान नो राईट टर्न उपक्रम राबविला. या उपक्रमाची वेळ सायंकाळी ५.३० पासून ८.३० पर्यंत ठेवण्यात आली.
पोलीस उपायुक्त अर्चित चांडक यांनी हा प्रयोग नागपुरातील वाहनचालकांवर करुन बघितला. पहिल्याच प्रयोगात त्यांना अपयश आले. अनेक नागरिकांनी उपायुक्त चांडक यांच्या अफलातून प्रयोगावर नाराजी व्यक्त केली. अनेक नागरिकांना वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागले. यामध्ये चक्क रुग्णवाहिकांचाही समावेश होता. वाहतूक पोलिसांच्या ‘नो राईट टर्न’ उपक्रमामुळे नागरिकांना सोयीचे होण्याऐवजी मनस्ताप सहन करावा लागत आहे. तरीही वाहतूक पोलीस उपायुक्तांनी केवळ प्रयोग करुन बघण्यासाठी नागपूरकरांना वेठीस धरले आहे.
आणखी वाचा-पत्नीच्या तिकिटासाठी खासदार प्रयत्नशील, मात्र काँग्रेस नेत्यांचा विरोध
जनता चौकात वाहतूक पोलीस तैनात करण्यात आले असले तरी त्याचा फटका काचीपुरा चौक, पंचशील चौक व धंतोलीकडून येणाऱ्या वाहनचालकांना बसत असून तेथे वाहनांच्या रांगा दिसून येत आहेत. त्यामुळे रहाटे कॉलनी, कृपलानी चौकातील वाहतूक कोंडी फुटण्याऐवजी अधिक वाढत आहे. त्यामुळे उपायुक्त अर्चित चांडक यांच्या अफलातून प्रयोगाला नागरिक त्रस्त झाले आहेत.
वळणासाठी फेऱ्यामुळे नागरिक त्रस्त
रोज सायंकाळी ५:३० ते ८:३० या कालावधीत रहाटे कॉलनी, कृपलानी चौकात होणारी कोंडी दूर होईल असा अंदाज पोलीस उपायुक्तांना होता. परंतु तो सपशेल चुकीचा ठरला. वर्धा मार्गावरील वाहनांना उजवे वळण घेता येत नसल्याने ‘यू-टर्न’साठी वाहनचालक जनता चौकात एकाच वेळी पोहचत आहेत. त्यामुळे तेथे सायंकाळी बराच वेळ वाहतूक कोंडी दिसून येत आहे. अगदी थोडे अंतर पार पाडण्यासाठी चक्क तीन किमीचा फेरा वाहनचालकांना घ्यावा लागत आहे. उजवे वळण घेता येत नसल्यामुळे वाहनचालकांना मनस्ताप होत आहे.