लोकसत्ता टीम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अमरावती : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षांनी आपले राजीनामे दिल्‍याने राजकीय वर्तुळात वेगळीच चर्चा रंगली आहे. जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुधाकर भारसाकळे व उपाध्यक्ष सुरेश साबळे यांनी दोन दिवसांपूर्वी आपले राजीनामे सादर केले. उद्या बुधवारी २१ जून रोजी होणाऱ्या संचालक मंडळाच्या बैठकीत या राजीनाम्यांवर चर्चा केली जाणार आहे. राजकीय तडजोड म्‍हणून अध्यक्ष व उपाध्यक्षांचे राजीनामे घेण्यात आल्याची चर्चा आहे.

२०२१ मध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नवीन संचालक मंडळाची निवडणूक चांगलीच चुरशीची ठरली होती. त्यावेळी तत्कालीन पालकमंत्री अॅड. यशोमती ठाकूर, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख, माजी आमदार प्रा. वीरेंद्र जगताप यांच्‍या पॅनल विरोधात आमदार बच्चू कडू, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस संजय खोडके यांच्या नेतृत्‍वातील पॅनलशी चुरशीची लढत झाली होती. त्यामध्ये बबलू देशमुख यांच्या सहकार पॅनलने १२ जागा मिळविता बँकेवर आपला झेंडा रोवला होता. अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवडणूक ऑक्टोबर २०२१ मध्ये झाली. त्यामध्ये अध्यक्षपदी सुधाकर भारसाकळे यांची, तर उपाध्यक्षपदी सुरेश साबळे यांची निवड झाली होती. आता दीड वर्षानंतर अध्यक्ष व उपाध्यक्षांनी आपल्या पदांचे राजीनामे दिल्याने त्‍यामागील राजकीय कारणांची चर्चा रंगली आहे.

मात्र निवडून आलेल्या पॅनलमधील इच्छुकांना अध्यक्ष तथा उपाध्यक्षपद भूषविता यावे, यासाठी दीड वर्षाचा कार्यकाळ निर्धारित करण्यात आला होता. त्या अनुषंगाने अध्यक्ष व उपाध्यक्षांनी आपले राजीनामे सादर केले, असे स्‍पष्‍टीकरण कॉंग्रेसचे जिल्‍हाध्‍यक्ष बबलू देशमुख यांनी दिले आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Resignation of chairman and vice chairman of district co operative bank amravati mma 73 mrj