लोकसत्ता टीम
गडचिरोली: सूरजागड लोहखाणीतून मागील दीड वर्षापासून राज्याच्या विविध भागात खनिज पोहोचविण्यात येत आहे. परंतु अवजड वाहनांमुळे उडणाऱ्या धुळीने नागरिकांना आता श्वसनाचे विकार उद्भवू लागले आहे. सोबतच मार्गालगत असलेली शेती देखील बाधित होत असल्याने नागरिकांना दुहेरी संकटाचा सामना करावा लागतो आहे. प्रशासनाला याबाबत वारंवार नवेदन दिल्यानंतरही यावर तोडगा निघत नसल्याने नागरिकांमधून रोष व्यक्त होत आहे.
सूरजागड येथे लोह खनिजाचे उत्खनन सुरू करण्यापूर्वी कंत्राटदार कंपनीला भविष्यात नागरिकांना अवजड वाहतूक, धूळ, खराब रस्ते या सारख्या समस्यांचा सामना करावा लागू नये म्हणून उपाययोजना करणे गरजेचे होते. मात्र, थातुरमातुर सोपस्कार पूर्ण करून येथे उत्खनन सुरू करण्यात आले. या खाणीतून आजतागायत हजारो कोटींचे खनिज बाहेर नेण्यात आले. परंतु धुळीमुळे या परिसराची अवस्था वाईट झाली आहे. अवजड वाहनांमुळे परिसरातील जवळपास ७० किमीचा रस्ता पूर्ण खराब झाला आहे. त्यामुळे या मार्गावर कायम धुळीचे साम्राज्य असते.
आणखी वाचा- पहिल्या टप्प्यापासूनच उत्साह, धो धो मतदानाची चिन्हे; निवडणूक पाच बाजार समित्यांची
आलापल्ली, लगाम, बोरी, आष्टी आदी गावांमध्ये तर नागरिकांना श्वसनाचे विकार उद्भवू लागले आहे. अनेकांना दमा, फुफुसाचा आजार झाल्याचे पाहायला मिळत आहे. दुसरीकडे या मार्गालगतची शेती देखील उद्ध्वस्त झाली. यावर तोडगा काढण्यासाठी मागील वर्षभरापासून नागरिकांनी प्रशासनाकडे अनेकदा निवेदने दिली. मात्र, अद्याप प्रशासनाकडून याबाबत कुठलेच पाऊल उचलण्यात आलेले नाही. उलट कंपनीच्या बाबतीत कुठली समस्या निर्माण झाल्यास ती सोडवण्यासाठी सर्व यंत्रणा तत्पर असतात, सर्वसामान्य नागरिकांची कुणालाच पर्वा नाही. अशी भावना येथील नागरीक बोलून दाखवीत आहेत.
वाहतूक कोंडी आणि दमदाटी
एटापल्ली ते आष्टी हा मार्ग मागील दोन वर्षांपासून पूर्णपणे खराब झाला आहे. सोबतच या मार्गावर शेकडो अवजड वाहनांची रेलचेल असते. त्यामुळे अनेकदा सर्वसामान्यांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो आहे. याबाबत बोलल्यास काही गुंड प्रवृत्तीचे लोक येऊन त्यांना दमदाटी देखील करतात. यामुळे देखील नागरिक हैराण आहेत.