लोकसत्ता टीम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नागपूर : शहरातील कायदा व सुव्यवस्था दिवसेंदिवस बिघडत असताना नागपुरातील अर्ध्यापेक्षा जास्त पोलीस ठाण्यात गुन्हे पोलीस निरीक्षक पदावर प्रभारींची नियुक्ती करण्याची वेळ पोलीस आयुक्तांना आली. शहरातील ३३ पैकी २० पोलीस ठाण्यात निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांऐवजी सहायक पोलीस निरीक्षकांकडे पदभार देण्यात आला. त्यामुळे आता पोलीस ठाण्यातील कारभार बिघडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गृहशहर असलेल्या नागपुरात पोलीस अधिकाऱ्यांची नेहमी वानवा असते. पोलीस उपनिरीक्षक ते पोलीस उपायुक्त दर्जापर्यंतचे अधिकारी नागपुरात काम करण्यास अनुत्सूक असतात. अनेक अधिकारी नागपुरात बदली झाल्यानंतर आठवड्याभरात दुसरीकडे बदली करून घेतात. त्यामुळे शहराला पोलीस अधिकारी मिळत नाहीत. मात्र, सध्या शहरातील ३३ पोलीस ठाण्यापैकी २० पोलीस ठाण्यात नवखे असलेल्या पोलीस निरीक्षकांना ठाणेदार म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे. तर काही वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना वाहतूक, विशेष शाखा, आर्थिक शाखा यासह अन्य ‘साईड ब्रँच’ला ठेवण्यात आले आहे. त्यामुळे शहरातील अर्ध्यापेक्षा जास्त पोलीस ठाण्यात द्वितीय निरीक्षक म्हणजेच गुन्हे निरीक्षक पदावर नियुक्ती करण्यासाठी कनिष्ठ पोलीस निरीक्षकच उपलब्ध नाहीत. त्यामुळे पोलीस आयुक्तांना तब्बल २० पोलीस ठाण्यात गुन्हे निरीक्षक पदावर २० सहायक निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांनी नियुक्ती करण्याची नामुष्की आली आहे. तसा आदेशही पोलीस आयुक्तांनी नुकताच काढला आहे. शहरातील या स्थितीमुळे कायदा व सुव्यवस्था बिघडू शकते. सहायक निरीक्षकांना तेवढा अनुभव नसतो, त्यामुळे पोलीस ठाण्याचा कारभारही बिघडण्याची शक्यता आहे.

आणखी वाचा-नागपूरकरांनो महालकडे जायचे आहे? घराबाहेर पडताना ‘हे’ रस्ते टाळा

पुन्हा अंतर्गत बदल्या

अनुभवी वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना ‘साईड पोस्टींग’ला ठेवून कनिष्ठ निरीक्षकांना ठाणेदारी देण्यात येत असल्यामुळे अधिकाऱ्यांमध्ये खदखद आहे. अनेक ठाण्याचा पदभार अगदी नवख्या निरीक्षकांकडे देण्यात आला आहे. नुकताच १७ पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या होत्या. मात्र, येत्या आठवड्यात पुन्हा अंतर्गत बदल्या करण्यात येणार असल्याची माहिती विश्वसनिय सूत्रांनी दिली आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Responsibility of crime inspector on api officers in nagpur city adk 83 mrj