‘लॉयन्य क्लब ऑफ अकोला मिडटाऊन’च्यावतीने हृदयरुग्णांना नवसंजीवनी देण्याचा उपक्रम गत २६ वर्षांपासून राबविण्यात येत आहे. आतापर्यंत २११७ रुग्णांना याचा लाभ झाला आहे. यंदा ९ ते ११ मार्चदरम्यान हृदयरोग निदान व शस्त्रक्रिया उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती प्रकल्प प्रमुख सुभाषचंद्र चांडक यांनी दिली.
हेही वाचा >>>शरद पवारांमुळे शेतकरी आत्महत्येस प्रवृत्त!, चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका
‘लॉयन्स क्लब इंटरनॅशनल’ अंतर्गत ‘लॉयन्स क्लब ऑफ अकोला मिडटाऊन’च्यावतीने हृदय रोग निदान व शस्त्रक्रियेच्या नि:शुल्क उपक्रमाचे आयोजन करण्यात येते. गत २६ वर्षांपासून हृदयरोग निदान व शस्त्रक्रिया उपक्रम घेण्यता येत असून आतापर्यंत २११७ रुग्णांना त्याचा लाभ मिळाला. यावर्षी ९ ते ११ मार्च दरम्यान शहरातील गोरक्षण मार्गावरील लोटस रुग्णालयात हे शिबीर घेण्यात येणार आहे. यासाठी डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालय, शेगाव येथील माऊली हृदयरोग केंद्र व लोटस रुग्णालयाचे सहकार्य लाभणार आहे. डॉ. अंबरिश खटोड, डॉ. तुषार चरखा, डॉ विशाल काळे आदी तज्ज्ञ डॉक्टर हृदयरुग्णांची तपासणी करणार आहेत. जन्मापासून हृदयरोगाचा त्रास असलेल्या रुग्णांपासून इतरही त्रास असलेल्या रुग्णांची तपासणी केली जाईल. आवश्यकतेनुसार विविध चाचण्या करून अकोला व शेगाव येथील रुग्णालयात १८ व १९ मार्च रोजी शस्त्रक्रिया करण्यात येईल. अवघड शस्त्रक्रिया मुंबई येथे करण्यात येणार आहे. हृदयशस्त्रक्रियेसाठी तज्ज्ञ डॉ. के. एन. भोसले व डॉ. सुश्रुत पोटवार त्यांच्या चमूसह अकोल्यात दाखन होणार आहेत, असे सुभाषचंद्र चांडक यांनी सांगितले.