अमरावती : संगणकीय क्षेत्रात सायबर गुन्हेगारीचा झालेला शिरकाव हा अनेक अनर्थ व संकटांना आमंत्रण देणारा आहे. साधारणत: सर्वसामान्य नागरिकांचा असा समज आहे की, सायबर गुन्हेगारीशी आपला काही संबंध नाही. या समजामुळे नागरिक याबाबतीत अनभिज्ञ आहेत. त्यातच आता सायबर लुटारूंनी आता सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना लक्ष्य केल्याचे अलीकडच्या काळातील घटनांमधून दिसून आले आहे.
शहरातील एका सेवानिवृत्त माजी सैनिकाला अशाच सायबर गुन्हेगारीच्या घटनेत ३ लाख रुपये गमावावे लागले. संदीप नरेंद्र निरगुळे (३६) रा. सरस्वती नगर, हे माजी सैनिक आहेत. त्यांना एका सायबर लुटारूने व्हॉट्स अॅप समुहात सहभागी करून घेतले. या समुहावर वेगवेगळ्या जाहिरीती दिल्या जात होत्या. त्यात एंजेल ब्रोकिंग कंपनीच्या नावावर शेअर बाजारात गुंतवणूक करून चांगला परतावा मिळेल, अशी बतावणी करण्यात आली होती.
हेही वाचा – नागपुरात दोन दिवसांत करोनाचे तीन बळी; मृत्यू विश्लेषण समितीची लवकरच बैठक
हेही वाचा – ‘टायगर स्टेट’साठी दोन राज्यांत चुरस; मध्यप्रदेश की कर्नाटक?
या सायबर लुटारूने संदीप निरगुळे यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधला. एंजेल ब्रोकिंग कंपनीच्या माध्यमातून शेअर बाजारात गुंतवणूक ही लाभदायक असल्याचे त्यांना पटवून देण्याचा प्रयत्न केला. निरगुळे यांनी या व्यक्तीवर विश्वास ठेवला. आरोपीने नंतर निरगुळे आणि त्यांच्या पत्नीच्या नावाने या कंपनीत अकाउंट उघडण्यास सांगितले. त्यानंतर आरोपींनी वेगवेगळ्या नावाने फोन करून निरगुळे यांना आरोपींच्या पंजाब नॅशनल बँक, एचडीएफसी बँक खात्यात पैसे वळते करण्यास सांगितले. निरगुळे यांनी वेळोवेळी ते सांगतील तेवढी रक्कम जमा केली. एकूण ३ लाख १०० रुपये आरोपींच्या खात्यात त्यांनी वळते केले. तब्बल वर्षभर हा प्रकार घडला. एवढी मोठी रक्कम गुंतवून परतावा अजूनपर्यंत का मिळाला नाही, याची चौकशी निरगुळे यांनी सुरू केली, तेव्हा त्यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. निरगुळे यांनी या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.