आपली मुलगी सासरी गेल्यानंतर सुखी, समाधानी रहावी, हे कुठल्याही माता-पित्याचे स्वप्न. त्यासाठी जावयाची सरबराई करण्यासाठी धडपड. पण, पुण्यातील एका जावयाने सासऱ्याच्या या स्वप्नांचा चुराडा केला. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील (आयटी) कंपनी स्थापन करायची आहे, असे सांगून जावयाने सासऱ्याकडून तब्बल १ कोटी ४८ लाख रुपये उकळले. कंपनी तर सुरू केलीच नाही. पण, रक्कम घेऊन पळून गेला. येथील गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हॉलिवूड कॉलनीतील सेवानिवृत्त व्यक्तीने या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली असून पोलिसांनी या जावयाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
हेही वाचा >>> वयोवृद्ध रस्त्यावरच झाले आडवे! सिलिंडरच्या दराएवढी सरासरी ११७१ मिळते पेन्शन, ना नेते दखल घेतात ना शासन…
विक्रम अनिल दुबे (रा. महात्मा सोसायटी, कोथरूड, पुणे) असे आरोपी जावयाचे नाव आहे. हॉलिवूड कॉलनीत राहणाऱ्या तक्रारकर्त्या सेवानिवृत्त व्यक्तीला दोन मुली आहेत. मोठ्या मुलीचा विवाह विक्रम दुबे याच्यासोबत झाला होता. विक्रम हा माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत होता. सुरवातीला सर्वकाही सुरळीत सुरू होते. आपल्याला स्वत:ची कंपनी स्थापन करायची आहे, असे त्याने सासऱ्यांना सांगितले. आपलेही नाव कंपनीच्या संचालक मंडळात असेल, असा विश्वास जावयाने सासऱ्याला दिला. जावई विक्रम याने सासऱ्यांकडे मोठ्या भांडवलाची मागणी केली. गुंतवणुकीचा परतावा मिळाल्यावर आपण नफा आपसात वाटून घेऊ, अशी बतावणी त्याने केली.
आरोपी विक्रम दुबे याने १ जुलै २०१५ रोजी कंपनीची नोंदणी केली. मात्र, दस्तावेजात सासऱ्यांचे नाव कुठेही समाविष्ट केले नाही. दरम्यान, आयटी क्षेत्रातील ही कंपनी आपण अमरावती एमआयडीसी क्षेत्रात उभारू, त्यासाठी १३० एकर जागा एमआयडीसीत बघा, अशी विनंती सासऱ्यांना केली. सासऱ्यांना विक्रमने विश्वासात घेतले. मुलीच्या भवितव्याचा विचार करून त्यांनी मुदत ठेवीतील एक लाख रुपयांची रक्कम जावयाला दिली. त्यानंतर पगारातून देखील १४ हजार ५०० रुपये दिले. ते निवृत्त झाल्यानंतर आरोपीने त्यांच्या भविष्य निर्वाह निधीतून ११ लाख ८५ हजार रुपये स्वत:च्या खात्यात वळते केले. त्यानंतर जावयाने सासऱ्याच्या खात्यातून वेळोवेळी रक्कम स्वत:च्या खात्यात वळती केली. ही संपूर्ण रक्कम १ कोटी ४८ लाख ५३ हजार रुपये इतकी आहे.
हेही वाचा >>> नागपूर : ‘एच ३ एन २’ग्रस्त रुग्णाच्या मृत्यूला इतर आजार कारणीभूत; मृत्यू अंकेक्षण समितीच्या बैठकीत शिक्कामोर्तब
आरोपी जावयाने पुणे आणि अमरावती येथील एकूण तीन बँक खात्यातून ही रक्कम वळती केली. मात्र, कंपनी उभारण्यास टाळाटाळ चालवली. आरोपी विक्रमच्या पत्नीने कंपनीबाबत विचारणा सुरू केल्यावर दोघांमध्ये वाद वाढत गेला. परिणामी दोघांमध्ये घटस्फोट देखील झाला. पोलिसांनी फसवणूक करणाऱ्या जावयाच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे.