नागपूर : Maharashtra Weather Forecast दक्षिण-पश्चिम मान्सूनने अखेर देशातून पूर्णपणे माघार घेतली आहे. मान्सूनच्या परतीचा प्रवास यावर्षी आठ दिवस उशिराने सुरू झाला. यावर्षी २५ सप्टेंबरपासून मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरु झाला होता. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार दक्षिण-पश्चिम मान्सून १९ ऑक्टोंबरपर्यंत संपूर्ण देशातून परत गेला आहे. साधारणपणे दक्षिण-पश्चिम मान्सून एक जूनपर्यंत केरळमध्ये धडकतो आणि आठ जुलैपर्यंत संपूर्ण देशात पोहोचतो. उत्तर पश्चिम भारतामधून १७ सप्टेंबरला मान्सूनचा परतीचा प्रवास सुरु करतो.
१५ ऑक्टोबरपर्यंत मान्सून पूर्णपणे परततो. दक्षिण भारतात पूर्व-उत्तर हवा वाहण्यास सुरवात होऊन दोन ते तीन दिवसात या भागात उत्तर-पूर्व मान्सून पाऊस सुरु होऊ शकतो. उत्तर-पूर्व मान्सूनचे सुरुवातीचे चरण कमकूवत राहण्याची शक्यता आहे. भारतामध्ये अल निनोचा चांगलाच प्रभाव जाणवला. त्यामुळे जून ते सप्टेंबर २०२३ या कालावधीत पाऊस कमी पडला. २०२३ पूर्वी चार वर्षे भारतामध्ये मान्सून चांगला राहिला. काही वर्षे सामान्यपेक्षा जास्त पाऊस पडला.