गोंदिया : गेल्या वर्षी जिल्ह्यात धूमाकुळ घातलेल्या रानटी हत्तींच्या कळपाने पुनरागमन केले आहे. बुधवार, २६ एप्रिल रोजी अर्जुनी मोरगाव तालुक्यातील पळसगाव ते सर्रेगाव परिसरात सायंकाळी एका गुराख्याला हत्तींचा कळप दिसला. पडताळणी केली असता जिल्ह्यातील सीमेवर कळपाचे लोकेशन दिसून आले. हत्तींचा कळप नवेगावबांध राष्ट्रीय उद्यानाकडे जाण्याची शक्यता वनविभागाकडून वर्तविण्यात आली आहे. वनविभागाने या मार्गावरील बसवोडन गावात अलर्ट जारी केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात रानटी हत्तींचा कळप गडचिरोली जिल्ह्यातून गोंदिया जिल्ह्यात दाखल झाला होता. नवेगावबांध वन परिक्षेत्रांतर्गत कवठा जंगल परिसरात रानटी हत्तींनी बस्तान मांडले होते.  याच कालावधीत हत्तींच्या कळपाने एका आदिवासी शेतकऱ्याला ठार केले होते. जवळपास १५ दिवस या परिसरात धुमाकूळ घातल्यानंतर नांगलडोह येथील आदिवासींच्या वस्तीवर हल्ला करून त्यांच्या घराची व इतर जीवनोपयोगी साहित्याची नासधूस करत हत्तींचा कळप गडचिरोली जिल्ह्याच्या दिशेने वळला होता. त्यानंतर रानटी हत्ती दूर निघून गेले होते.

हेही वाचा >>> वाशीम जिल्ह्यात अवकाळी पाऊस, गारपिटीमुळे हाहाकार; वृक्ष, शाळा, घरांची पडझड

मात्र, गेल्या दोन ते चार दिवसांपूर्वी हे हत्ती पुन्हा गडचिरोली जिल्ह्यातील जंगलमार्गे गोंदिया जिल्ह्याच्या सीमेत दाखल झाले आहेत. २१ एप्रिल रोजी या हत्तींचे लोकेशन गोंदिया व गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेवरील गडचिरोली जिल्ह्यातील पुराडा वनपरिक्षेत्र, रामगड बीटमध्ये दिसून आले होते. बुधवारी सायंकाळी हत्तींच्या कळपाने जिल्ह्याची सीमा ओलांडली असून सध्या हे हत्ती जिल्ह्यातील पळसगाव व सर्रेगाव शिवारात असल्याची माहिती आहे. सावधगिरी म्हणून वनविभागाने नवेगाव बांध उद्यान आणि बसवोडन गावात अलर्ट जारी केला आहे. रानटी हत्तींच्या पुनरागमनामुळे शेतकऱ्यांमध्ये पुन्हा दहशत पसरली आहे.

हेही वाचा >>> काय म्हणता..! महाराष्ट्रातील २० पैकी १३ मंत्र्यांवर गंभीर गुन्हे, भाजपच्या सात तर शिवसेनेच्या सहा मंत्र्यांचा समावेश

वनाधिकारी, कर्मचाऱ्यांनी सावध राहावे

रानटी हत्तींच्या कळपाने जिल्ह्यात प्रवेश केला आहे. सद्यस्थितीत त्यांचे लोकेशन पळसगाव व सर्रेगावच्या मध्यभागी असून नवेगावबांध उद्यानाच्या दिशेने जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे बसवोडन ग्रामस्थांना दक्षतेचा इसारा देण्यात आला आहे. सध्याच कडक पहारा, बंदोबस्त ठेवण्याची आवश्यकता नाही. परंतु हत्तीच्या कळपाची हालचाल व धोका लक्षात घेऊन वनविभागाच्या सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी पथकांसह सावध राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती नवेगावबांधचे सहाय्यक वनसंरक्षक दादा राऊत यांनी दिली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Return of wild elephants to gondia district alert in baswodan village sar 75 ysh
Show comments