लोकसभा निवडणुकीतील पराभव माझ्या वर्मी लागला आहे, मला हा बदला घ्यायचा आहे, मी सोडणार नाही, हे वक्तव्य आहे माजी केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर यांचे. अहीर यांच्या वक्तव्याची ही चित्रफीत समाज माध्यमावर सध्या चांगलीच सार्वत्रिक झाली आहे. या भाषणातून अहीर यांनी एकप्रकारे काँग्रेसचे राज्यातील एकमेव खासदार बाळू धानोरकर यांना उघड आवाहन दिले आहे. अहीर यांच्या या आवाहनाची सध्या राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा सुरू आहे.
जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहण्यास सुरुवात झाली आहे. भाजपचे केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरजितसिंग पुरी, राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या जाहीर सभा घेऊन लोकसभा प्रवास तथा मिशन १४४ अभियानाची सुरुवात केली आहे. एकप्रकारे भाजपने प्रचाराचा नारळ फोडला आहे. तर तिकडे काँग्रेस खासदार बाळू धानोरकर यांनीही पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठका, दांडिया महोत्सव, मॅरेथॉनच्या माध्यमातून जनसंपर्क अभियान सुरू केले आहे. भाजपच्या वर्तुळात अहीर की मुनगंटीवार ही चर्चा सुरू असतानाच अहीर यांची एक चित्रफीत समाज माध्यमावर सध्या चांगलीच सार्वत्रिक झाली आहे. या चित्रफीतमध्ये अहीर यांनी काँग्रेसचे विद्यमान खासदार बाळू धानोरकर यांचे नाव न घेता त्यांना थेट आवाहन दिले आहे.
हेही वाचा >>> नागपूर : भाजप समर्थित उमेदावर नागो गाणारांची थेट देवेंद्र फडणवीसांविरोधात भूमिका
यात माजी मंत्री अहीर यांनी लोकसभा निवडणुकीतील पराभव वर्मी लागला असल्याचे म्हटले आहे. या पराभवाचा बदला मी नक्कीच घेणार असे सांगताना, मी सोडणार नाही, असेही म्हटले आहे. २०१९ च्या निवडणुकीत काही काम न करणारा व्यक्ती जिंकून आला, आता तोच मला सांगतो, बसवले की नाही घरामध्ये. अरे तू जिंकून आला असला तरी घरी बसला आहे, मी पराभूत होऊनही बाहेर लोकांमध्ये आहे. या भाषणातून अहीर यांनी आगामी लोकसभा निवडणुकीचे इरादे स्पष्ट केले आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीला १५ महिन्यांचा अवधी शिल्लक असला तरी या जिल्ह्यात आतापासूनच राजकारण पेटायला सुरुवात झाली आहे.