नागपूर : राज्यात लाचखोरी आणि भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमध्ये सातत्याने वाढ होत असून लाचखोरीत महसूल विभाग पहिल्यावर तर पोलीस विभाग द्वितीय स्थानावर आहे. गेल्या सहा महिन्यांत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ४३४ सापळे रचले असून त्यात ६०५ शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांना अटक केली आहे. अशी धक्कादायक आकडेवारी एसीबीच्या संकेतस्थळावर प्रकाशित झाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शासकीय विभागात लाच दिल्याशिवाय कोणतेच काम होत नाही, ही वस्तुस्थिती आहे. अनेकजण कार्यालयीन कर्मचाऱ्यांचा नाहक त्रास नको म्हणून चिरीमिरी देतात. तर सामान्य नागरिकांना शासकीय कार्यालयाच्या वारंवार पायऱ्या झिजवा‌व्या लागतात. लाच न मिळाल्यास शासकीय कर्मचारी सामान्य नागरिकांचे काम करीत नाहीत. राज्यात लाचखोरी प्रत्येक शासकीय विभागात वाढली असून महसूल विभाग पहिल्या तर पोलीस विभाग द्वितीय क्रमांकावर कायम आहे. महसूल विभागात सर्वाधिक तलाठी तर पोलीस विभागात सर्वाधिक पोलीस हवालदारांचा लाचखोरांमध्ये समावेश आहे.

हेही वाचा – “देश विकणाऱ्या काँग्रेसला नाकारले व चहा विकणाऱ्या…”, अनुराग ठाकूर यांचं विधान

गेल्या सहा महिन्यांत महसूल विभागात १०४ लाचखोरीचे सापळे रचले गेले असून त्यात १४२ लाचखोर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये ८७ वर्ग तीनच्या कर्मऱ्यांचा समावेश आहे. पोलीस विभागावर ७९ सापळे रचले गेले असून १०९ लाचखोर पोलीस अधिकारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली. त्यात ८४ पोलीस हवालदारांचा समावेश आहे. तिसऱ्या स्थानावर पंचायत समिती असून ४५ सापळे रचण्यात आले असून ५९ लाचखोर अधिकारी-कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली. त्यानंतर लाचखोरीत महापालिका, वीज महामंडळ आणि शिक्षण विभागाचा क्रमांक लागतो.

नागपूर परीक्षेत्रात तक्रारदारांना योग्य प्रतिसाद नाही

नाशिकमध्ये सर्वाधिक लाचखोरीचे गुन्हे दाखल झाले असून तब्बल ९१ शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर सापळे रचण्यात आले. त्यानंतर लाचखोरीत द्वितीय स्थानावर पुणे आणि छत्रपती संभाजीनगर असून प्रत्येक ७४ लाचखोरीचे गुन्हे दाखल आहेत. तिसऱ्या स्थानावर ठाणे (५४) असून नागपूरचा (४३) सातवा क्रमांक लागतो. नागपूर परीक्षेत्रात अनेक तक्रारदारांना योग्य प्रतिसाद मिळत नसल्यामुळे सापळा कारवाईमध्ये राज्यात शेवटच्या क्रमांकावर असल्याचे समोर आले.

हेही वाचा – ग्रंथपालांच्या जीवनात उगवली पहाट! वेतनश्रेणी मिळण्याचा मार्ग मोकळा

लाचखोरीची आकडेवारी

महिना, सापळा, आरोपी

जानेवारी – ५९ – ४६
फेब्रुवारी – ७५ – १११
मार्च – ८८ – १२४
एप्रिल – ७० – १००
मे – ६९ – १००
जून – ७३ – ९०

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Revenue and police department top in bribery nashik is first and pune is second adk 83 ssb