वर्धा : सद् रक्षणाय, खलनिग्रणाय हे पोलीस दलाचे ब्रीदवाक्य. २४ तास पोलिसाने सेवेत असलेच पाहिजे ही अपेक्षा. कुठंही काही विपरीत घडले की पोलिसांनी त्वरित हजर झालेच पाहिजे, ही समाज मानसिकता. आता तर उन्हाळा लागला व उष्णतेची संभाव्य लाट, गृहीत धरून महसूल खात्याने मार्गदर्शन केले आहे. खात्याच्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने पोलीस खात्याने काय दक्षता घेतली पाहिजे यासाठी अन्य विभागासोबतच पोलीस दलावर काही जबाबदाऱ्या टाकल्या आहेत.
वाहतुकीचे ठिकठिकाणी सिग्नल असतात. अश्या ठिकाणी निवारा किंवा बूथ असावे.पोलीस ठाणे आणि वाहतूक बूथवर प्रथमोपचार पेटी ठेवावी. प्रत्येक पोलीस ठाण्यात एका पोलीस कर्मचाऱ्याची निवड करावी. त्यास उष्माघात प्रथमोपचार व अनुषंगिक प्रशिक्षण देण्यात यावे.खुल्या जागेत दुपारी आयोजित केलेल्या कार्यक्रमांना परवानगी देवू नये. कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात मुबलक पाणी उपलब्ध असेल याची दक्षता घ्यावे. कार्यक्रमासाठी किती प्रमाणात जागा आहे हे तपासून परवानगी द्यावी. हवामान खात्याकडून उष्णतेबाबत वारंवार सूचना येत असतात. ज्या दिवशी उष्णतेची लाट येण्याचा ईशारा असेल त्या दिवशी मोठ्या कार्यक्रमांना परवानगी देवू नये, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
उष्णतेची लाट आणि त्यामुळे अपेक्षित संभाव्य धोके टाळणे हीच खबरदारी ठरते. त्यात सार्वजनिक कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात असलेल्या उपस्थितीस उन्हाचा फटका बसू, नये यासाठी पोलिसांनाच काळजी घ्यायची आहे. सामान्य मानवी शरीराचे तापमान ३६. ४ ते ३७. २ अंश सेल्सीअस म्हणजेच ९७. ५ ते ९८. ९ फॅ. असते. त्यापेक्षा अधिक तापमान असल्यास फटका बसू शकतो. हिट स्ट्रेस होवू शकतो. चक्कर येणे किंवा बेशुद्ध होण्याचे प्रकार घडतात.
पोलीस खात्यासोबतच विविध शासकीय खात्याना पण सतर्क करण्यात आले आहे. स्थानिक प्रशासनाने सार्वजनिक ठिकाणी पुरेशी सावली तसेच थंड पाण्याची व्यवस्था करणे अपेक्षित आहे. सार्वजनिक उद्याने दुपारी १२ ते ४ या वेळेत खुली ठेवण्याची सूचना आहे. शक्य असल्यास रस्त्यावर पाणी शिंपडावे. उष्णतेच्या लाटेबाबत मार्गदर्शन करणारे प्रचार साहित्य उपलब्ध करावे. राज्यात विविध जिल्ह्यात दरवर्षी उष्णतेच्या लाटेचा प्रभाव दिसून येत असतो. त्यामुळे आरोग्याशी संबंधित गंभीर समस्या निर्माण होण्याची संभावना असते. त्यादृष्टीने ही काळजी घेण्याबाबत बजावण्यात आले आहे.