अनिल कांबळे, लोकसत्ता
नागपूर : गेल्या पाच वर्षांपासून लाचखोरी किंवा भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमध्ये पहिल्या स्थानावर असलेल्या राज्य पोलीस विभागात गेल्या वर्षभरापासून पारदर्शकता वाढल्याचे दिसून येत आहे. परिणामी पोलीस दलात लाचखोरीच्या प्रकरणांमध्ये घट झाली आहे. राज्यात ६२७ लाच प्रकरणांची नोंद झाली असून त्यामध्ये ८७३ लाचखोर अधिकारी-कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल आहे. राज्यात महसूल विभाग लाचखोरीत पहिल्या क्रमांकावर असून पोलीस विभाग दुसऱ्या स्थानावर आहे, ही माहिती पोलिसांच्या संकेतस्थळावरून मिळाली आहे.
हेही वाचा >>> “‘ट्रिपल इंजिन’ सरकारमधील तिन्ही पक्षांत तिजोरी लुटण्याची स्पर्धा”, वडेट्टीवार यांची टीका; म्हणाले…
पोलीस खात्यात लाच दिल्याशिवाय तक्रार दाखल होत नाही, तपास पुढे जात नाही आणि आरोपींवर योग्य ती कारवाई होत नाही, असा अनेकांची धारणा आहे. मात्र, पोलीस महासंचालक रजनीश सेठ, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे (एसीबी) पोलीस महासंचालक निकेत कौशिक यांच्या कार्यकाळात राज्य पोलीस दलात लाचखोरींच्या प्रकरणात कमालीची घट झाली आहे. गेल्या पाच वर्षांपासून पोलीस विभाग लाचखोरीत अन्य शासकीय विभागाच्या तुलनेत अव्वल होता. सर्वाधिक लाचखोरी पोलीस खात्यात होत असल्याने पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर ‘एसीबी’च्या सापळा कारवाई मोठय़ा प्रमाणात होत होत्या. मात्र, सध्या पोलीस विभागात पारदर्शक कार्यभार सुरळीत सुरू असल्याने लाचखोरीचे प्रमाण कमी झाले आहे. गेल्या जानेवारी ते सप्टेंबर या ९ महिन्यांत महसूल, भूमिलेख, नोंदणी या विभागात सर्वाधिक लाचखोरीचे प्रकरणे समोर आली आहेत. १६५ लाचखोरीचे प्रकरणे समोर आले असून या विभागातील २१८ अधिकारी-कर्मचाऱ्यांवर लाचखोरीचे गुन्हे दाखल आहे. लाचखोरांमध्ये ३ प्रथम वर्ग अधिकारी, १२ द्वितीय वर्ग तर १४२ तृतीय वर्ग अधिकाऱ्यांचा समावेश आहे. त्या तुलनेत पोलीस विभागात ११० सापळा कारवाईत १४९ लाचखोर पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. त्यामध्ये २० अधिकारी तर ११२ पोलीस हवालदार-अंमलदारांचा समावेश आहे.
हेही वाचा >>> सुप्रिया सुळेंची टीका, म्हणाल्या, “दिल्लीचा अदृश्य हात महाराष्ट्राच्या विरोधात”
उपराजधानी पाचव्या क्रमांकावर गेल्या दहा महिन्यात लाचखोरीचे सर्वाधिक गुन्हे नाशिक विभागात नोंदवली गेले. नाशिकमध्ये १३१ गुन्हे दाखल झाले असून २२४ जणांवर लाच मागितल्याप्रकरणी कारवाई केली. पुणे लाचखोरीमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. ११० सापळा कारवाईमध्ये १५९ लाचखोर अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. छत्रपती संभाजीनगर शहरात १०६ गुन्ह्यांत १४१ आरोपी तर ठाण्यात ८१ गुन्ह्यांत ११७ लाचखोर आरोपींवर कारवाई झाली. नागपूर पाचव्या क्रमांकावर असून ६१ गुन्ह्यांत ९४ लाचखोरांवर कारवाई करण्यात आली.