वर्धा : भाजपचे प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे बोलायला मोकळे ढाकळे असल्याचे म्हटल्या जातात. त्यामुळे ते उपस्थित असतात तेव्हा गप्पांचा फड रंगला असल्याचे वर्धेकरांनी पाहले आहे. वर्ध्यात जेवून थेट पुण्यास पोहचणाऱ्या बावनकुळे यांचा असाच हा किस्सा. ते देवळी येथील एका कार्यक्रमास शुक्रवारी सायंकाळी हजर झाले होते. कार्यक्रम आटोपल्यावर आमदार राजेश बकाने यांनी त्यांना जेवण करण्याचा आग्रह केला. पण अश्या ठिकाणी मसालेदार व केटरर्सचे जेवण. असे चमचमीत जेवण नको म्हणत बावनकुळे यांनी परत निघण्याची घाई करीत गाडीत बसले. मात्र पोटात तर कावळे ओरडत होते. सकाळपासून निवांत बसून काही खाणे झाले नव्हते. म्हणून वाटेत गाडीत असतांना ते पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांना म्हणाले की कुठे साधे जेवण भेटत असेल तर बघा. डॉ. भोयर यांनी समृद्धी मार्गाच्या अलीकडे असलेल्या करुणाश्रमचे  आशिष गोस्वामी यांना फोन लावून दिला. फोनवरच साधे जेवण तयार ठेवण्याची सूचना झाली.

अर्ध्या तासात बावनकुळे यांचा ताफा करुणाश्रम  येथील इको पार्कमध्ये पोहचला. सोबत माजी खासदार रामदास तडस, भाजप जिल्हाध्यक्ष सुनील गफाट व अन्य मंडळी होती. जेवणाचे टेबल लावून तयार होते. साधे जेवण सूचना असल्याने भरीत, भाकर, मेथीची भाजी व टमाटर चटणी असा बेत. समरसून सर्व जेवले. मग पैसे द्यायची वेळ आली, तेव्हा तडस व अन्य पुढे आले. तेव्हा कुणीही नका देवू, मीच देतो असे बावनकुळे निक्षुन म्हणाले. मी पोरीकडचा, जावयाचे कर्ज नको रे बाबा असे म्हणत खिश्यातून पैसे काढत टेबलवर ठेवले. हे नाते कसे ?  तर इको पार्कचे संचालक आशिष गोस्वामी यांच्या पत्नी कोराडीच्या व बावनकुळे हे पण कोराडीचे. असे हे नाते. जेवत असतांना गोस्वामी यांनी कुटुंबाचा परिचय करून दिला होता. तो धागा स्मरून बावनकुळे यांनी हजारजबाबी  उत्तर दिले. मात्र या उत्तराने चांगलाच हास्यकल्लोळ उडाला. बावनकुळे यांच्या सोबत ५० लोकांचा ताफा होता. त्यांना जे असेल ते खाऊ घाला. उपाशी ठेवू नका, असे सांगायला ते विसरले नाही.

सर्वांचे जेवण आटोपल्यावर व पैसे देऊन झाल्यावर बावनकुळे यांचा ताफा समृद्धी मार्गावर वळला. तेथून नागपूर एअर पोर्ट व मग थेट पूणे. इको पार्क ईथे बावनकुळे यांचा थोडा आठवणीचा ठेवा आहे. ते पूर्वी वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री  होते. त्यावेळी तत्कालीन जिल्हाधिकारी विवेक भिमनवर  हे जिल्हाधिकारी होते. त्यांना इको पार्कला  शासकीय दर्जा देण्याचा प्रस्ताव ठेवला. तेव्हा पालकमंत्री असलेल्या बावनकुळे यांनी या पर्यावरण पूरक उपक्रमाचे स्वागत करीत प्रस्ताव त्वरित मंजूर केल्याची बाब गोस्वामी यांनी सांगितली.

Story img Loader