नागपूर : शहर काँग्रेसचे अध्यक्ष व आमदार विकास ठाकरे यांनी शहरातील सर्व ६ विधानसभा मतदारसंघावर दावा केल्याने महाविकास आघाडीतील शिवसेना (ठाकरे) आणि राष्ट्रवादी (शरद पवार)कडून इच्छुक नाराज आहेत.
महाविकास आघाडीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या कॉंग्रेसची नागपूर विधानसभा आढावा बैठक रविवारी सायंकाळी गंजीपेठ येथील रजवाडा पॅलेस येथे आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला पक्षाचे प्रदेश प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले प्रामुख्याने उपस्थित राहणार आहे.
हे ही वाचा…नागपुरातील नागनदीची पूजा, श्राद्ध, अन् प्रसाद वाटपाचे नियोजन,पुरग्रस्त म्हणतात…
कॉंग्रेसतफें राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यात आला. तसेच, जिल्हानिहाय आढावाही घेतला जात आहे. कोणत्या मतदारसंघात पक्षाची ताकद किती, सहकारी पक्ष किती बळकट, विजयाचे सूत्र कसे असेल याबाबतही चर्चा केली जात आहे. नागपूर शहरात ६ विधानसभा मतदारसंघ आहे. २०१९ च्या निवडणूक पश्चिममधून शहराध्यक्ष विकास ठाकरे तर, उत्तर मधून माजी मंत्री नितीन राऊत असे दोघे विजयी झाले. तर, दक्षिण व मध्य असे दोन मतदारसंघात काँग्रेसचा निसटता पराभव झाला. यावेळी पक्षाने सर्व सहाही मतदारसंघात लक्ष केंद्रीत केले आहे. सहकारी शिवसेना ठाकरे गट व राष्ट्रवादी शरद पवार गटाने शहरातही काही जागांची मागणी केली असली तरी संघटनात्मक रचना व विजयाची शक्यता यावर उमेदवारी ठरणार आहे. यानुसार कॉंग्रेसचा दावा शहरात बळकट आहे. लोकसभा निवडणूक भाजप उमेदवाराचे मताधिक्य घटले आहे. त्यामुळे पक्षाकडून चांगले उमेदवार देऊन संघटीतपणे निवडणूकीला सामोरे जाण्याची तयारी केली जात आहे.
हे ही वाचा…नागपूर : गडकरी म्हणाले “आम्हाला गॅरंटी नाही, मात्र आठवले यांना चौथ्यांदा मंत्री होण्याची गॅरंटी…..”
या बैठकीच्या माध्यमातून काँग्रेसचे सर्व सहा उमेदवार निश्चित केले जाण्याचे संकेत देण्यात येत आहे. मध्य नागपूर विधानसभा मतदारसंघातून युवक काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव बंटी शेळके, माजी मंत्री अनिस अहमद, अतुल कोटेचा, शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्ष नंदा पराते यांचा दावा आहे.
आमदार विकास ठाकरे आणि नितीन राऊत आमदार असल्याने पश्चिम आणि उत्तर नागपूरचे उमेदवार निश्चित मानले जात आहे. दक्षिण, पूर्व, मध्य आणि दक्षिण-पश्चिम या विधानसभेसाठी काँग्रेसला उमेदवार ठरवायचे आहे. दक्षिण-पश्चिमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव प्रफुल गुडधे यांची उमेदवारीसुद्धा निश्चित मानली जात आहे. दक्षिणमध्ये गिरीश पांडव, विशाल मुत्तेमवार, संजय महाकाळकर, अतुल लोंढे इच्छुक आहेत. पूर्व मध्ये संगीता तलमले, पुरुषोत्तम हजारे यांच्या नावाची चर्चा आहे.