नागपूर : सामाजिक व शैक्षणिकदृष्टया मागासवर्गाकरिता आरक्षण विचारात घेऊन नव्याने आरक्षणनिश्चिती केली जाणार आहे आणि सुधारित परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) प्रसिद्धिपत्रकाद्वारे कळविले आहे. विशेष म्हणजे, परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याने विद्यार्थ्यांमध्ये नाराजी असल्याचे वृत्त ‘लोकसत्ता’ने प्रकाशित केले होते. आयोगाने याची दखल घेत लवकरच तारखा जाहीर होणार असे कळवले आहे.
हेही वाचा >>> मलकापूर रेल्वेस्थानक परिसरात चोरट्यांचा गोळीबार; पाठलाग करणाऱ्या नागरिकांना…
राज्यातील सामाजिक आणि शैक्षणिकदृष्टया मागासवर्गाकरिता आरक्षण अधिनियमामधील तरतुदी २६ फेब्रुवारी २०२४ पासून लागू झाल्या. मात्र त्यापूर्वी जाहिरात प्रसिद्ध होऊन अर्ज मागविण्यात आलेले असून निवड प्रक्रिया सुरू झालेली नाही. अशा प्रकरणी शासनाकडून सामाजिक व शैक्षणिकदृष्टया मागासवर्गाकरिता आरक्षण विचारात घेऊन नव्याने आरक्षणनिश्चिती करून घेणे गरजेचे आहे. त्याप्रमाणे मागणीपत्र पाठविण्याबाबत शासनाच्या सर्व संबंधित प्रशासकीय विभागांना कळविण्यात आले आहे.
आयोगामार्फत महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२४ करिता २९ डिसेंबर २०२३ रोजी विविध संवर्गातील २७४ पदांकरिता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. ही परीक्षा २८ एप्रिल २०२४ रोजी घेण्यात येणार होती; परंतु महाराष्ट्र राज्यातील सामाजिक आणि शैक्षणिकदृष्टया मागासवर्गाकरिता आरक्षण अधिनियम, २०२४ अमलात आल्याने या अधिनियमातील तरतुदी विचारात घेता आयोगाच्या महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ तसेच समाजकल्याण अधिकारी, गट-ब आणि इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी, गट-ब या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. ‘लोकसत्ता’ने मराठा आरक्षणाच्या निश्चितीसाठी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचे वृत्त प्रकाशित केले होते. यानंतर आयोगाने याची दखल घेत लवकरच तारखा जाहीर करण्याचे आश्वासन दिले.
सुधारित मागणीपत्राची प्रतीक्षा
सुधारित मागणीपत्र आयोगास प्राप्त होण्यास किती कालावधी लागेल याबाबत निश्चितता नसल्याने सध्या परीक्षेची सुधारित तारीख जाहीर करता येत नाही. प्रस्तुत परीक्षेतील सर्व संवर्गाकरिता प्रशासकीय विभागाकडून सुधारित मागणीपत्र प्राप्त झाल्यानंतर परीक्षेच्या पूर्वतयारीकरिता पुरेसा कालावधी देऊन परीक्षेचा सुधारित दिनांक आयोगामार्फत जाहीर करण्यात येईल, असे कळवण्यात आले आहे.