नवनवीन कायदे, नियम, शस्त्र आणि तंत्रप्रणालीची ओळख होऊन ती कर्मचाऱ्यांनी आत्मसात करावी, या उद्देशाने शहर पोलीस दलातील सर्वच पोलीस ठाणे, विशेष शाखा, वाहतूक विभाग, आर्थिक सेल, गुन्हे शाखा यासह अन्य शाखांमधून उजळणी प्रशिक्षणाच्या (रिफ्रेशर कोर्स) नावावर ठराविक पोलीस कर्मचाऱ्यांची पोलीस मुख्यालयात रवानगी केली जाते.मात्र, कर्मचाऱ्यांना कोणतेही प्रशिक्षण न देता उजळणी प्रशिक्षणाच्या नावाखाली कर्मचाऱ्यांना केवळ आरोपी सेलमध्ये कर्तव्य बजावून घेण्यात येत असल्याची बाब उघडकीस आली आहे.सूत्रांच्या माहितीनुसार, पोलीस दलात नोकरी लागण्यापूर्वी कर्मचाऱ्यांना ९ महिन्यांचे प्राथमिक प्रशिक्षण देण्यात येते.
हेही वाचा : विश्लेषण : जिथे कमी तिथे मोदी? भाजपची लोकसभेसाठी काय आहे रणनीती?
प्रशिक्षणादरम्यान कायदा व सुव्यवस्था, शस्त्रासह शारीरिक तंदुरुस्तीबाबतही प्रशिक्षण देण्यात येते. त्यानंतर मात्र कर्मचाऱ्यांना कोणतेही प्रशिक्षण देण्यात येत नाही.काळानुरूप कायदे आणि नियमांत बदल होतात. त्या नियमांची माहिती व्हावी आणि पोलीस कर्मचारी ‘अपडेट’ राहावा या उद्देशाने पोलीस मुख्यालयात उजळणी प्रशिक्षण घेण्यात येते. पोलीस ठाणे, विशेष शाखा, वाहतूक विभाग, आर्थिक सेल, गुन्हे शाखा यासह अन्य शाखांमधून प्रत्येकी ३ ते ५ कर्मचाऱ्यांना उजळणी प्रशिक्षणासाठी पाठविण्यात येते.
मात्र, गेल्या काही महिन्यांपासून पोलीस कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण न देता त्यांना ड्युटी पास देऊन थेट आरोपी सेलमध्ये पाठविण्यात येते. त्यांच्याकडून आरोपींना कारागृहातून न्यायालयापर्यंत ने-आण किंवा अन्य कर्तव्य बजावून घेण्यात येते. त्यामुळे उजळणी प्रशिक्षणाच्या नावाखाली कुचंबणा करण्यात येत असल्याच्या अनेक पोलीस कर्मचाऱ्यांच्या तक्रारी आहेत. या संदर्भात पोलीस मुख्यालयाच्या उपायुक्त चेतना तिडके यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यांच्या मोबाईलवर संदेश पाठवला असता त्यांनी प्रत्युत्तर दिले नाही.
हेही वाचा : विश्लेषण : साजिद खानमुळे पुन्हा चर्चेत आलेली MeToo मोहीम नक्की आहे तरी काय? जाणून घ्या
कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रत्येक पोलीस कर्मचाऱ्याचे योगदान असावे. त्यासाठी कर्मचाऱ्यांचा उजळणी प्रशिक्षण होणे गरजेचे आहे. या कालावधीत कर्मचाऱ्यांना वकील आणि कायदेतज्ज्ञांकडून मार्गदर्शन मिळावे, शारीरिक तंदुरुस्तीसाठी वर्ग घेण्यात यावे तसेच नवीन शस्त्र आणि तंत्रप्रणालीचे प्रशिक्षण मिळणे अपेक्षित असते. मात्र, उजळणी प्रशिक्षण वर्ग न होता कर्मचाऱ्यांची अन्य ठिकाणी ड्युटी लावण्यात येत असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये खदखद आहे.