चंद्रपूर : एक वर्षापूर्वी, २ एप्रिल रोजी सिंदेवाही तालुक्यातील लाडबोरी या छोट्याशा गावात आणि जिल्ह्यात इतर काही ठिकाणी अंतराळातून कोसळलेले रिंग व सिलिंडर चीनच्या ‘लाँगमार्च सॅटेलाईट’ या उपग्रहाचे अवशेष होते, यावर भारतीय अंतराळ संस्था इस्रो आणि अमेरिकेच्या चंद्रा ऑब्जर्वेटरी या संस्थांनी शिक्कामोर्तब केले आहे. इस्रोने राज्य सरकारला या बाबतचा अहवाल सादर केला असून, तो गोपनीय ठेवण्यात आला आहे.
अवकाशातून जिल्ह्यात विविध ठिकाणी कोसळलेल्या वस्तूंचे इस्रोने सखोल निरीक्षण केले. ते चीनच्या ‘लाँगमार्च सॅटेलाईट’चे अवशेष असल्याचे निष्पन्न झाले आहे. चीनने ‘लाँगमार्च’ हा उपग्रह अवकाशात सोडला होता. तो बंगालच्या खाडीत कोसळणे अपेक्षित होते. परंतु, त्या उपग्रहाचे अवशेष समुद्रात न पडता विविध देशांत कोसळले. महाराष्ट्रातील चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली जिल्ह्यातील विविध भागांत ते कोसळले. चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील लाडबोरी गावात मोठी रिंग व सिलिंडर कोसळले होते. नासाची एक संस्था असलेल्या चंद्रा ऑब्जर्वेटरी या संस्थेचे शास्त्रज्ञ जॉननॉन आणि इस्रोच्या शास्त्रज्ञांनी ते चीनच्या लाँगमार्च उपग्रहाचेच अवशेष असल्याचे स्पष्ट केले आहे. याबाबतचा अहवाल राज्य सरकारला सादर करण्यात आला आहे.