नागपूर : शहराच्या हृदयस्थानी वसलेली वस्ती म्हणजे महाल… सामाजिक एकोपा ही या वस्तीची ओळख… दिवाळीच्या दिव्यांनी मुस्लिमांची अंगणे उजळायची आणि ईदच्या सेवयांचा गंध हिंदूंच्या घरी दरवळायचा…पण, आता हा इतिहास झालाय…१७ मार्चला झालेल्या दंगलीमुळे महालातल्या एकोप्यालाच जणू तडा गेलाय…‘लोकसत्ता’ने या वस्तीत फिरून जे दंगलग्रस्तांचे दु:ख अनुभवले त्याचा हा सचित्र वृत्तांत…

दंगलीनंतर नेमके काय बदलले, असे जुने हिस्लॉप कॉलेज परिसरातील नागरिकांना विचारल्यावर ते म्हणाले, ती काळरात्र अजून मनाचा थरकाप उडवते. दंगलीने विश्वासालाच तडा दिलाय. भाजीवाला, फुलवाला, रिक्षावाला अजूनही दारात येतो. पण, आता आम्ही ते कोणत्या धर्माचे आहेत हे आधी तपासून पाहतो आणि नंतरच त्यांच्याशी बोलतो. इरफान (नाव बदललेले) हा अनेक वर्षे आमच्या परिसरात फूल विकतोय. परंतु, आता त्याच्याजवळून कुणी फुले घ्यायलाही घाबरतात, असे या नागरिकांनी सांगितले.

ज्या भागात दंगलीचा भडका सर्वात आधी उडाला तेथील दहीकर कुटुंब म्हणाले, रस्त्याच्या पलीकडे संपूर्ण वस्ती दुसऱ्या समाजाची आहे. परंतु, आमच्यात कधीही कटुता आली नाही. कधी आम्हाला त्यांच्याविषयी द्वेष वाटला नाही. कायम एकोप्याचे संबंध राहिले. आमच्या शेजारचे कुटुंब तर गणपती उत्सवासह सर्वच सणांमध्ये सहभागी होत होते. अनेक स्पर्धांमध्ये परीक्षक म्हणून त्यांनी काम केले. नुकत्याच झालेल्या रांगोळी स्पर्धेमध्ये तेच परीक्षक होते. परंतु, आता आम्ही केवळ एकमेकांकडे बघतो, संवादाची शक्यता धूसर झाली आहे. आजही चार व्यक्ती एकत्र फिरताना दिसले तरी मनात भीती वाटते, असेही येथील काही नागरिकांनी सांगितले.

द्वेष नाही, पण भीती आहेच

जुने हिस्लॉप कॉलेज परिसरात एका बाजूला भालदारपुरा आणि दुसऱ्या बाजूला जोहरीपुरा आहे. मध्ये इतर समाजाची वसाहत आहे. येथील एकाने सांगितले, सुरुवातीपासून सर्वच समाजाचे लोक परस्परांशी व्यवसाय करायचे. मागील चार वर्षांपासून एक फूलवाला रोज आमच्या भागात येत होता. सर्व त्याच्याकडून नियमित फूल घ्यायचे. परंतु, आता तो दिसला तरी कुणी त्याच्याकडून फूल घेत नाहीत. भाजीवाला, रिक्षावालाही दुसऱ्या धर्माचा दिसला की आम्ही व्यवहार करत नाही. आमच्या मनात कुठल्याही जातीविषयी द्वेष नाही. परंतु, १७ मार्चच्या दंगलीनंतर मने कलुषित झाली आहेत.

राजकारण त्यांचे, नुकसान आमचे

दंगलीनंतर आमच्या परिसराला परिणाम भोगावे लागले. हे संतापजनक आहे, अशी प्रतिक्रिया नाव न छापण्याच्या अटीवर जुने हिस्लॉप कॉलेज परिसरातील एका कुटुंबाने दिली. औरंगजेबाच्या कबरीवरून सुरुवातीला जे आंदोलन झाले ते झालेच नसते तर आज आमच्या घरातील वस्तूंचे इतके नुकसान झाले नसते. कर्जावर घेतलेल्या वाहनांची होळी बघावी लागली नसती. सरकारकडून अजून आम्हाला एक रुपयाचीही मदत मिळाली नाही. एका चिथावणीखोर आंदोलनाचे परिणाम आम्हाला अकारण आजही भोगावे लागत आहेत.

‘चाचा’ मला जपतात, धर्म कशाला बघू?

जुने हिस्लॉप कॉलेज परिसरातील एका आठ वर्षीय चिमुकलीने दंगल आपल्या डोळ्याने अनुभवली. याचे परिणाम तिच्या बालमनावर झाले. आजही ती या दहशतीमधून बाहेर निघालेली नाही. परंतु, तिचे ऑटो चालक ‘चाचा’ आहेत. ते तिला रोज तिच्या घराच्या दारात सोडतात. दंगलीमुळे मनात खूप भीतीचे वातावरण आहे. परंतु, आमचे ‘चाचा’ अनेक वर्षांपासून सोबत आहेत. ते मला सुखरूप शाळेत नेऊन सोडतात व घरी आणून सोडतात हेच माझ्यासाठी महत्त्वाचे आहे. त्यांचा धर्म मी कशाला बघू, लाखमोलाचा सवाल केवळ आठ वर्षांच्या चिमुकलीने विचारला.