अकोला : महामार्गांवर वाहन चालवताना चालकांचा निष्काळजीपणा जीवावर उठला आहे. अपघाताच्या संख्येत वाढ झाली असून गत तीन महिन्यात ५२ जणांचा अपघात बळी गेला. हेल्मेट परिधान न करणे देखील जीवघेणे ठरत आहे. अपघातांच्या वाढत्या संकटावर नियंत्रण मिळवण्याची गरज असून परिवहन विभागाकडून कारवाईची विशेष मोहीम राबवली जाणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अकोला जिल्ह्यामध्ये विविध कारणांवरून रस्ते अपघाताची संख्या झपाट्याने वाढली. पोलीस दप्तरी नोंद असलेल्या अपघातांच्या आकडेवारीवरून हे स्पष्ट होते. अपघातांसाठी रस्त्यांच्या दयनीय अवस्थेसह मानवी चुका देखील कारणीभूत ठरल्या आहेत. गेल्या तीन वर्षांतील अपघाताची आकडेवारी लक्षात घेता एकूण ४५९ गंभीर रस्ते अपघात झाले आहेत.

हेही वाचा…नागपूर : वाठोडा परिसरात एका सदनिकेत देहव्यापार, दोन तरुणींची सुटका तर दोघींना अटक

जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग ५३ व राष्ट्रीय महामार्ग १६१ वर अपघातांच्या संख्येमध्ये सातत्याने वाढ झाल्याचे दिसून येते. यावर्षी जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांमध्ये ५२ प्रवाशांचा मृत्यू ओढवला. गेल्या वर्षी प्रतिमहिना सरासरी १६ जणांचा मृत्यू झाला होता. अपघातात मृत्यू होण्याच्या प्रमाणात सुमारे १० टक्क्यांनी वाढ नोंदवल्या गेली आहे.

अपघाताचे वाढते प्रमाण कमी करण्यासाठी परिवहन विभागाद्वारे विविध उपाययोजना करण्याचे नियोजन आहे. अपघात प्रवणस्थळांवर वाहनांची तपासणीची विशेष मोहीम राबवली जाईल. यात प्रामुख्याने हेल्मेटचा वापराची सक्ती करण्यात येणार आहे. अपघात रोखण्यासाठी गतिरोधक, माहितीसाठी फलक, वेगमर्यादेचे नियंत्रण असणे गरजेचे आहे. रस्त्याच्या कडेला फलक लावून संदेश, अपघात प्रवण क्षेत्रात सूचना देणारे फलक, रस्ता सुरक्षेसाठी उजव्या बाजूने चालावे, यासाठी जनजागृती करण्यात येईल. नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाईचा बडगा देखील उगरला जाणार आहे.

हेही वाचा…वाशीम : मानोऱ्यात जोरदार पाऊस; नागरिकांची उकाड्यापासून सुटका

यामध्ये विनाहेल्मेट, सीटबेल्ट न वापरणे, विरुद्ध दिशेने वाहन चालवणे, सिग्नल तोडणे, वाहन चालवतांना मोबाइलचा वापर, मद्यप्राशन करून वाहन चालवणे, भार क्षमतेपेक्षा जास्त मालाची वाहतूक करणे, वाहनाला योग्यता प्रमाणपत्र नसणे आदी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याची माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी जयश्री दुतोंडे यांनी दिली.

हेही वाचा…मध्य भारतामधील बिबट्या मांजराचे पहिले दर्शन महाराष्ट्रातील ‘या’ ठिकाणी…

विनाहेल्मेटमुळे वर्षभरात सरासरी ४० जणांचा मृत्यू

अनेक वेळा अपघातात दुचाकी चालकांनी हेल्मेट परिधान न केल्याने त्यांचा मृत्यू ओढवल्याचे समोर आले. गेल्या तीन वर्षांतील गंभीर अपघाताची आकडेवारी लक्षात घेता सन २०२१ मध्ये १५१ अपघात होऊन १६७ जणांचा मृत्यू झाला. त्यापैकी २३ दुचाकी वाहन चालकांनी हेल्मेट परिधान न केल्याने त्यांचा मृत्यू झाला असून २० जण गंभीर जखमी झाले. सन २०२२ मध्ये १३१ गंभीर अपघात झाले असून १४१ जणांचा मृत्यू झाला. त्यामध्ये ४० दुचाकीचालकांनी हेल्मेट परिधान न केल्याने त्यांचा मृत्यू झाला, तर ३२ जण जखमी झाले होते. सन २०२३ मध्ये १७७ गंभीर स्वरूपाचे अपघात झाले. त्यात १८८ जणांचा जीव गेला असून ५७ दुचाकीचालकांनी हेल्मेटचा वापर न केल्याने त्यांचा अपघातात बळी गेला.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rising highway accidents in akola 52 deaths in three months ppd 88 psg