नागपूर : राज्याच्या सर्वच भागातून आता पावसाने काढता पाय घेतला आहे. त्यामुळे सूर्यनारायणाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. पावसाने विश्रांती घेतल्यानंतर तापमानात कमालीची वाढ झाली आहे. राज्याच्या अनेक भागात तापमान चाळीशीपार गेले आहे. तर विदर्भात तो ४३-४४ अंश सेल्सिअसवर गेला आहे. शनिवार आणि रविवार त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे दोन दिवस उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागणार आहे.
बदलत्या हवामानाचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर देखील होत आहे. अधूनमधून येणाऱ्या अवकाळी पावसामुळे उन्हाच्या चटक्यांसोबत उकड्याचा देखील सामना करावा लागत आहे आणि ते आरोग्यासाठी जास्त धोकादायक आहे. उष्माघाताचे रुग्ण हळूहळू वाढत आहेत. गेल्या तीन दिवसांपासून तापमानात जराही घट झालेली नाही, उलट त्यात वाढ होत आहे. त्यामुळे घामाच्या धारा आणखी वाढत आहेत.
हेही वाचा…वाशीम : कडक उन्हात पाण्यासाठी पायपीट; कोट्यवधी रुपयांचा कृती आराखडा मात्र उपाय योजना कधी ?
दरम्यान राज्यातील तापमानाचा पुढच्या तीन दिवसांचा अंदाज भारतीय हवामान खात्याने दिला आहे. लोकांनी कामाशिवाय घराबाहेर पडू नये असा इशारा दिला आहे. राज्यातील कमाल आणि किमान तापमानात वाढ अपेक्षित आहे. किमान तापमान आताच २४-२५ अंश सेल्सिअसजवळ पोहचला आहे आणि त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. राज्यातील आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून सर्व प्रकारच्या आव्हानांसाठी तयार आहे. रुग्णालये देखील सज्ज आहेत.