नागपूर: वायू प्रदूषणामुळे श्वासाशी संबंधित समस्या उद्भवत असतानाच आता त्यामुळे स्तनाच्या कर्करोगाचा धोका असल्याचेदेखील समोर आले आहे. स्तनाच्या कर्करोगाच्या झपाट्याने वाढणाऱ्या घटनांमागे वायू प्रदूषण हे देखील एक कारण असू शकते, असे संशोधनात म्हटले आहे.
‘नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्युट’च्या शोधपत्रिकेत प्रकाशित झालेल्या या संशोधनानुसार, हवेतील प्रदूषित घटक म्हणजेच पीएम २.५ आणि पीएम १०च्या संपर्कात आल्याने स्तनाच्या कर्करोगाचा धोका वाढतो. घराच्या आत आणि घराबाहेर वायू प्रदूषणाच्या संपर्कात आलेल्या लोकांमध्ये कर्करोगाचा धोका आठ टक्क्यांनी वाढला आहे. प्रामुख्याने पीएम २.५ म्हणजेच अतिसूक्ष्म धूलिकणाच्या संपर्कात राहणाऱ्या लोकांमध्ये हे प्रमाण अधिक आहे. अमेरिका आणि फ्रान्स या दोन देशांमधील संशोधकांनी तब्बल २० वर्षे सुमारे पाच लाख महिला आणि पुरुषांवर हे संशोधन केले. यात स्तनाच्या कर्करोगाचे १५ हजार ८७० रुग्ण आढळले. सल्फर डायऑक्साइड आणि नायट्रोजन ऑक्साइड यांसारख्या वायूंच्या रासायनिक अभिक्रियांद्वारे वातावरणात तयार झालेल्या अतिसूक्ष्म धूलिकणांना जोडणाऱ्या अनेक गोष्टी या अभ्यासातून समोर आल्या आहेत. यामुळे रोगराई आणि अकाली मृत्यू होत असल्याचेदेखील या संशोधनात नमूद आहे.
हेही वाचा… जेईई साठी नोंदणी सुरू; निकालाची तारीखही जाहीर
आधीच हृदय किंवा फुप्फुसाच्या आजाराने ग्रस्त असलेल्या लोकांमध्ये ही समस्या अधिक दिसून येते. संशोधनात वायू प्रदूषण आणि स्तनाच्या कर्करोगाचा काय संबंध आहे, याचा उल्लेख करण्यात आलेला नाही. तरी वायू प्रदूषणाचा भविष्यात स्तनाच्या कर्करोगावर कसा परिणाम होईल आणि त्याचा धोका वाढेल, यावरही संशोधनात एकमत झाले आहे. एखाद्या महिलेला स्तनाचा कर्करोग होईल की नाही, हे ती श्वास घेत असलेल्या हवेवर अवलंबून असते, असे या संशोधनात म्हटले आहे. १९६५ ते १९८५ दरम्यान भारतात स्तनाच्या कर्करोगाच्या घटनांमध्ये ५० टक्क्यांनी वाढ झाली आहे. २०३० पर्यंत स्तनाच्या कर्करोगाच्या जागतिक घटना २० लाखांपेक्षा जास्त होण्याची अपेक्षा आहे, असा अंदाज या अभ्यासात व्यक्त करण्यात आला आहे.