क्राॅनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज (सीओपीडी) हा फुफ्फुसांचा आजार धूम्रपान करणाऱ्यांमध्ये जास्त असल्याचे सांगितले जाते. परंतु प्रदूषण, घर व परिसरातील धुरामुळेही हा आजार अनेकांना होत असल्याचे एका अभ्यासातून समोर आले आहे. नागपुरातील क्रिम्स रुग्णालयाने मध्य भारतातील १,२०० रुग्णांवर केलेल्या या अभ्यासात एकूण रुग्णांत धूम्रपान करणारे केवळ ३५ टक्के रुग्ण होते. आज १६ नोव्हेंबरला जागतिक सीओपीडी दिवस आहे. त्यानिमित्ताने घेतलेला हा आढावा.
हेही वाचा >>>नवाब मलिक यांच्यावर ‘अॅट्रॉसिटी’अंतर्गत गुन्हा दाखल करा; वाशीम जिल्हा न्यायालयाचे आदेश
क्रिम्स रुग्णालयात विदर्भासह छत्तीसगड, मध्यप्रदेश या तीन राज्यातून मोठ्या संख्येने श्वसन, फुफ्फुसांशी संबंधित रुग्ण येतात. त्यापैकी येथे गेल्या पाच वर्षांत १ हजार २०० रुग्णांमध्ये सीओपीडीचे निदान झाले. या रुग्णांचा अभ्यास करण्यात आला. त्यात ३५ टक्के रुग्णांना धूम्रपानाची पार्श्वभूमी होती. इतर ६५ टक्के रुग्णांच्या आजाराला घर व कामाच्या ठिकाणावरील प्रदूषण, सातत्याने धूर असलेल्या भागात वास्तव्य, घरातील मच्छर अगरबत्ती, औद्योगिक प्रदूषण कारणीभूत असल्याचे निदर्शनात आहे. सीओपीडी विकारासंबंधी जनजागृती नसल्याने अर्ध्याहून अधिक रुग्ण आजार गंभीर झाल्यावर येतात. जर रुग्ण वेळेत डॉक्टरांपर्यंत पोहचले तर सीओपीडीमुळे होणारे मृत्यू निश्चितच कमी करता येतील आणि रुग्णाच्या फुफ्फुसांची क्षमता देखील कमी होण्यापासून वाचवता येईल, असे क्रिम्स रुग्णालयाचे संचालक व श्वसनरोग तज्ज्ञ डॉ. अशोक अरबट यांनी सांगितले.
हेही वाचा >>>महाज्योतीचे व्यवस्थापकीय संचालक बदला; आमदार पडळकर यांची उपमुख्यमंत्र्याकडे मागणी
सीओपीडी म्हणजे काय?
सीओपीडी विकारात फुफ्फुसात श्वासाद्वारे प्रदूषण, धूर अथवा धूम्रपानादी कारणांनी कार्बन मोनोक्साईड, सल्फरडाय ऑक्साईड, धूलिकण अथवा अन्य कण प्रवेश करतात. फुफ्फुसात ‘ॲल्विओलाय’ नामक घटक रक्तात ऑक्सिजन सोडण्याचे व कार्बन डाय ऑक्साईड शोषून घेण्याचे कार्य करतात. हे प्रदूषित घटक त्या ‘ॲल्विओलाय’वर आघात करून त्याचा घेर वाढवतात व त्यामुळे फुफ्फुसाची लवचीकता कमी होऊन ते प्रसरण पावण्याची प्रक्रिया सुरू होते. त्यामुळे शरीराला पुरेसा प्राणवायु मिळत नाही आणि कार्बनडाय ऑक्साईडचे योग्य पद्धतीने उत्सर्जन होत नाही. अशा वेळी शारीरिक गुंतागुंत वाढून सीओपीडी होते. साधारणतः चाळीसी अथवा पन्नाशीनंतर आजाराला सुरुवात होते.
हेही वाचा >>>भारत जोडो’ला ज्येष्ठ विचारवंत, समाजसेवींचे बळ; खा. राहुल गांधींची पदयात्रा आज अकोला जिल्ह्यात दाखल होणार
जोखीम कुणाला?
सतत प्रदूषणयुक्त वातावरणात फिरणारे, धूम्रपान व तंबाखूचे व्यसन करणारे, विविध धुराशी प्रत्यक्ष संपर्कात येणारे, चुलीवर स्वयंपाक करणारे, धुराचा निचरा होण्याची जागा (व्हेंटिलेशन व्यवस्था) नसलेल्या ठिकाणी राहणारे, कारखान्यामध्ये अथवा धूरयुक्त वातावरणात आपला वेळ अधिक घालवणाऱ्यांना सीओपीडीचा धोका अधिक असतो. या आजाराच्या लक्षणांमध्ये सुरुवातीला सर्दी-खोकला होतो. कालांतराने दम लागणे सुरू होते. उपचारपद्धती ही दम्याप्रमाणे इनहेलर थेरपी व औषधोपचार हीच आहे. मात्र, यासोबतच रिहॅबिलिटेशन थेरपी देखील आवश्यक असल्याचे डॉ. अरबट यांनी सांगितले. हा आजार टाळण्यासाठी धूम्रपान टाळणे, प्रदूषणापासून लांब, मोकळ्या हवेत राहणे व फुफ्फुसाचे व्यायाम करणे फायद्याचे असल्याचेही त्यांनी सांगितले.
हेही वाचा >>>नागपूर: शिकवणी वर्गांकडून शिष्यवृत्ती, प्रवेश परीक्षांचे आमिष दाखवून पालकांची लूट
अभ्यासातील निरीक्षण
पुरुषांची संख्या – ७० टक्के
महिलांची संख्या – ३० टक्के
धूम्रपान करणारे – ३५-४० टक्के
धूम्रपान न करणारे – ६०-६५ टक्के
तीव्र विकार असणारे – ७६ टक्के
मध्यम विकार असणारे – २२ टक्के
सौम्य विकार असणारे – २ टक्के