नागपूर: मुंबईतील घाटकोपरमध्ये वादळामुळे जाहिरात फलक कोसळण्याच्या घटनेमुळे राज्यभरातील उंच फलकांच्या मजबुतीची तपासणी केली जात आहे. मात्र शहरातील काही उंच इमारतींच्या छतावर सुरू असलेल्या ‘रुफ टॉप रेस्टॉरन्ट’ कडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागपूर शहराच्या विविध भागात सध्या २० ते २२ ‘रुफ टॉप रेस्टॉरन्ट’ आहेत. त्यापैकी तर काही लोकवस्तींच्या ठिकाणी आहेत. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यापैकी काहींना महापालिका, अन्न औषध प्रशासन व तत्सम खात्याची परवानगी नाही. रेस्टॉरन्टमध्ये सुशोभीकरणासाठी काही ठिकाणी तात्पुर्ते शेड उभारण्यात आले आहेत. तेथे रात्रीला ग्राहकांची गर्दी होते. सध्या उन्हाळ्यातही वादळी पाऊस पडतो आहे. मुंबईप्रमाणेच नागपुरातही वादळी पाऊस आल्यास या रेस्टॉरन्टला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. आग किंवा तत्सम स्वरुपाची दुर्घटना घडल्यास आपात्कालीन स्थितीत बाहेर पडण्याची सोय काही ठिकाणी नाही. त्यामुळे महापालिकेने जाहिरात फलकांप्रमाणेच या रेस्टॉरन्टची तपासणी करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते भूषण दडवे यांनी केली आहे.

हेही वाचा >>>जागतिक उच्च रक्तदाब दिन विशेष : ४० टक्के रुग्णांना उच्च रक्तदाबाची समस्या

दरम्यान महापालिकेच्या. तपासणी पथकाने  गुरुवारी मानकापूर, गिट्टीखादन, जरीपटका, इंदोरा, झिंगाबाई टाकळी, सदर, कोराडी नाका, राजनगर, बैरामजी टाऊन या भागातील तर दुसऱ्या पथकाने रविनगर, धरमपेठ, गोकुळपेठ, शंकरनगर, व्हेरायची चौक, महाराजबाग चौक, अमरावती रोड, रामनगर या भागातील फलकांची तपासणी केली. फलकांची उंची, महापालिकेचा परवाना, ज्या आकाराची परवानगी दिली त्या आकारात फलक आहे की नाही आणि ज्या लोखंडी कठड्यावर किंवा इमारतीवर फलक लावले आहे ते मजबूत आहे की नाही याची तपासणी केली जात आहे. ४० जाहिरात फलकांमध्ये काही त्रुटी आढळून आल्या. त्यांना लवकरच नोटीस दिली जाणार आहे.लक्ष्मीनगर चौक व कॅफे हाऊस येथील जीर्ण इमारतीवर तुषार एजन्सीने जाहिरात फलक लावले होते. त्यामुळे ते फलक काढण्यात आले.

ड्रोनव्दारे तपासणी

शहरातील अनेक भागात जाहिरात फलक उंच इमारतीवर लावण्यात आले आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांना इमारतीवर जाऊन तपासणी करणे कठीण होत आहे. अशा जाहिरात फलकांची ड्रोनच्या माध्यमातून तपासणी केली जात आहे. गुरुवारी पाच जाहिरात फलकांची तपासणी करण्यात आली.

हेही वाचा >>>नागपूर : अल्पवयीन भाचीसह १८ वर्षाच्या मावशीवर बलात्कार, पीडितेची प्रकृती बिघडल्यामुळे उलगडा…

रेल्वेकडून विचारणा नाही

रेल्वेच्या जागेवर अनेक मोठे फलक लावण्यात आले असून त्यांना रेल्वे विभागाने मंजुरी दिली आहे. मात्र जाहिरात फलक लावताना महापालिकेची परवानगी घेतली जात नाही किंवा रेल्वेकडून विचारणा केली जात नसल्यामुळे महापालिकेचे सहायक आयुक्त मिलिंद मेश्राम यांनी नाराजी व्यक्त केली. येणाऱ्या १५ दिवसात फलकांची तपासणी केली जाणार असून जे अनधिकृत फलक आहेत त्यांच्यावर कारवाई केली जाणार असल्याचे मेश्राम यांनी सांगितले.

पाच कोटी २८ लाखांची थकबाकी

महापालिकेत ३२ एजन्सीच्या माध्यमातून जाहिरात फलक लावले गेले. त्यातील २२ एजन्सीकडे ५ कोटी २८ लाखांची थकबाकी आहे. यापूर्वी महापालिकेने थकबाकी असलेल्या एजन्सीला नोटीस दिली होती. मात्र थकबाकी भरली नाही. त्यामुळे ४ एजन्सीचे फलक काढण्यात आले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Risk of rain with strong winds how safe is a roof top restaurant nagpur cwb 76 amy
Show comments