लोकसत्ता टीम

यवतमाळ : जिल्ह्यात साथींच्या आजारांनी डोके वर काढले असून ‘स्क्रब टायफस’चे १० रुग्ण आढळल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. डेंग्यू, मलेरिया, टायफईड या साथी पाठोपाठ स्क्रब टायफस चा धोका वाढला आहे. येथील कै.वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आतापर्यंत दहापेक्षा जास्त रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत. पावसाळ्यात गवतात होणारे पिसू, गवतावरील माशा व कीटक चावल्यामुळे हा आजार होतो.

साधारणपणे ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात हा आजार डोके वर काढतो. सध्या यवतमाळ जिल्ह्यात या आजाराचे रुग्ण वाढत असल्याचे चित्र आहे. भारताच्या सीमावर्ती व डोंगराळ भागात व नेपाळमध्ये आढळणारा हा तापाचा प्रकार जिल्ह्यात तो आता भारतातही हळूहळू सर्वत्र पसरत आहे. तापाच्या रुग्णांचे रक्ताचे नमूने घेण्यात आल्यावर हे रुग्ण स्क्रब टायफासचे असल्याचे स्पष्ट झाले. स्क्रब टायफस हा एक प्रकारचा तीव्र स्वरूपाचा ताप येणारा आजार आहे.

आणखी वाचा-खळबळजनक! विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांचे जुगार अड्डे

या आजारात डोक दुखणे, थंडी वाजणे, ताप येणे अशी प्राथमिक लक्षणे आढळतात. शरीराच्या ज्या भागावर किडा चावतो, त्या जागेवर काळ्या रंगाची जखम होते. त्याभोवती एक ते दोन समी व्यासाची गडद लाल रंगाचे रिंग (स्क्रब) तयार होते. ती जखम दुखत नाही. त्यातून कोणत्याही प्रकारचा स्त्राव वाहत नाही. रुग्णाच्या शरीरातील पांढर्‍या पेशीचे प्रमाण घटत जाते. त्याचा परिणाम शरीरातील किडनी, ह्रदय व मेंदूवर होण्याची शक्यता अधिक असते. आजाराचे वेळीच निदान न झाल्यास रुग्णाच्या जीवाला धोका निर्माण होण्याची भीती आहे.

आणखी वाचा-धक्कादायक..! राज्यात प्रत्येक ३९ मिनिटाला एक नवजात मृत्यू

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल झालेल्या रुग्णांवर वेळीच उपचार करण्यात आल्याने येथे धोकादायक स्थितीतील रुग्ण नसल्याचे वैद्यकीय महाविद्यालयातील अधिकाऱ्यांनी सांगितले. वैद्यकीय महाविद्यालयात आतापर्यंत १० पेक्षा जास्त स्क्रब टायफसचे रुग्ण उपचारासाठी आले. त्यांची प्रकृती आता चांगली आहे. मात्र तापाची लक्षणे दिसल्यास कोणत्याही प्रकारचा आजार अंगावर न काढता, तत्काळ तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार करून घ्यावे, असे आवाहन येथील वैद्यकीय महाविद्यालयातील औषध वैद्यकशास्त्र विभाग प्रमुख डॉ. बाबा येलकेयांनी केले आहे.