चंद्रपूर : स्पर्धा परिक्षेत ग्रामीण भागातील विद्यार्थी यश संपादन करून अधिकारी पदावर रूजू होत आहेत. गोंडपिपरी या अतिदुर्गम तालुक्यातील रितेश रेकचंद झाडे या तरुणाने परिश्रमाच्या भरवशावर कस्टम इन्स्पेक्टर पद मिळवले आहे.शुक्रवारी रितेश गोवा येथे या पदावर रूजू झाला. दरम्यान, केंद्र सरकारच्या सेवेत निवडीची बातमी कळताच कुटूंबात आनंदाचे वातावरण पसरले.
जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक रेकचंद झाडे यांचा रितेश हा सुपूत्र. रितेशचे प्राथमिक शिक्षण गोंडपिपरी व बल्लारपूर येथील शाळा व कनिष्ठ महाविद्यालयात पूर्ण केले. त्यानंतर चंद्रपूरच्या राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयातून त्याने इंजिनिअरची पदवी घेतली. यानंतर तो स्पर्धा परीक्षेकडे वळला.म
हेही वाचा >>> नागपूर: पार्टी करायला गेले अन् पाच तरूण तलावात बुडाले ; पोहण्याचा मोह आला अंगलट
दरम्यान, त्याने स्टॉफ सिलेक्शनची परीक्षा दिली. यात त्याने यश मिळविले. त्यानंतर तो पुणे येथे इन्कम टॅक्स विभागात रुजू झाला. पुणे, सांगली येथे सेवा दिल्यानंतर त्याने कस्टम इनिस्पेक्टर होण्याचे स्वप्न बघितले. त्यादृष्टीने प्रयत्न केले. या पदासाठी पुन्हा एकदा रितेशने स्टॉफ सिलेक्शन कमिशनची परीक्षा दिली. दरम्यान, नुकताच या परीक्षेचा निकाल लागला आहे. या परिक्षेत रितेशने घवघवीत यश मिळविले.. सारे सोपस्कार पार पडल्यावर रितेश काल या पदावर गोवा येथे सेवा देण्यासाठी रुजू झाला आहे. महाराष्ट्रातून केवळ सहा तरुणांनी या परीक्षेत यश प्राप्त केले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातून एकमेव उत्तीर्ण होण्याचा मान रितेशने पटकविला आहे. रितेशने मिळविलेल्या यशाबाबत त्याचे वडील रेकचंद झाडे, आई रोझा झाडे व मित्रपरिवाराने त्याचे अभिनंदन केले.