नागपूर : रामझुला ‘हिट अँड रन’ प्रकरणातील मुख्य आरोपी प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी यांनी रितिका मालू हिला पोलीस कोठडी नाकारत न्यायालयीन कोठडी दिली होती. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, या प्रकरणाचा तपास तहसील पोलिसांकडून सीआयडीकडे वर्ग करण्यात आला. यानंतर वेगाने घटना घडल्या आणि अखेर रितिका हिला अटक करण्यात यश आले. रितिका हिची पोलीस कोठडी मिळवण्यासाठी सीआयडीने पुरेपूर प्रयत्न केले, मात्र पहिल्या प्रयत्नात त्यांना यश मिळाले नाही. यानंतर सीआयडीने सत्र न्यायालयात फेरविचार याचिका दाखल केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रितिकाची पोलीस कोठडी का हवी?

रितिका मालू आणि तिची साथिदार माधुरी सारडा या दोघ्याही मद्यधुंद अवस्थेत  कार चालवित होत्या. रामझुल्यावर त्यांनी दोन तरुणांना अक्षरश: चिरडून ठार केले. अपघातग्रस्ताना मदत करण्याचा कोणताही प्रयत्न त्यांनी केला नाही. रितू मालूची कोठडी अत्यंत आवश्यक असल्याचे सीआयडीने सत्र न्यायालयाला सांगितले. या प्रकरणाच्या तपासात तिने आतापर्यंत फारसे सहकार्य केलेले नाही. त्यामुळे तपासासाठी तिची कोठडी आवश्यक असल्याचा युक्तिवाद सीआयडीकडून करण्यात आला. सत्र न्यायालयाने रितिका मालू हिचा जामीन रद्द केल्यावर सीआयडीने अपघाताच्या सात महिन्यानंतर मध्यरात्री तिला अटक केली. यासाठी प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी यांचे न्यायालय रात्री साडे दहा वाजता उघडण्यात आले आणि मध्यरात्री अटकेची परवानगी देण्यात आली. मालू हिच्या मध्यरात्रीच्या अटकेवर नागपूर सत्र न्यायालयाचे प्रधान न्यायाधीश यांनी आक्षेप नोंदवित स्वत:हून याचिका दाखल करून घेतली होती. मात्र उच्च न्यायालयाने सत्र न्यायाधीश यांच्यावर याबाबत नाराजी व्यक्त करत त्यांच्या निर्णय रद्द केला होता.

हेही वाचा >>>धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त मुंबई – नागपूर विशेष रेल्वेगाड्या

प्रकरण काय?

२४ फेब्रुवारी रोजी मध्यरात्रीनंतर रामझुला पुलावर रितिका मालूने भरधाव वेगात गाडी चालवत मोहमद हुसेन गुलाम मुस्तफा आणि मोहमद आतिफ मोहमंद जिया यांना चिरडले होते. अपघातानंतर रितिका आणि तिची मैत्रिण माधुरी शिशिर सारडा या दोघी घटनास्थळावरून फरार झाल्या होत्या. काही दिवसाने दोघींनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण करत अपघात झाल्याची कबुली पोलिसांना दिली होती. याप्रकरणी तहसील पोलिसांनी भादंविच्या कलम २९७, ३३८, आणि ३०४ (अ) अंतर्गत जामीनपात्र गुन्हा दाखल केला होता. सत्र न्यायालयाने रामझुला अपघातातील मुख्य आरोपी रितिका मालूचा जामीन फेटाळला आणि अपघातानंतर २१४ दिवसांनी सीआयडीला कारवाई करण्याची परवानगी दिली होती.

आता काय घडले?

रामझुला ‘हिट अँड रन’ प्रकरणातील मुख्य आरोपी रितिका मालू हिला ताब्यात घेण्यासाठी राज्य गुन्हे अन्वेशन विभागाचे (सीआयडी) पथक कारागृहात पोहचले. दुपारी रितिकाला कारागृहातून बाहेर काढण्यात आले. सीआडीच्या पथकाने रितिकाला ताब्यात घेतले आणि मुख्यालयाकडे रवाना झाले. सोमवारी रितिकाची पोलीस कोठडी प्राप्त करण्यात सीआयडीला न्यायालयाने परवानगी दिली होती. नागपूर सत्र न्यायालयाने सोमवारी सीआयडीने दाखल केलेल्या फेरविचार याचिकेवर निर्णय देत रितिका हिला १० ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत पाठविण्याचे आदेश दिले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ritika malu main accused in nagpur hit and run case get police custody nagpur news adk 83 amy