नागपूर : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यामध्ये हिंमत असेल आणि त्यांच्यामधला शिवसैनिक जिवंत असेल तर त्यांनी भाजपला मदत करणारे राजकीय पक्षातील एजंट कोण याचे नाव जाहीर करावे. अन्यथा त्यांची स्वत:ला शिवसैनिक म्हणून घेण्याची लायकी नाही अशा शब्दात आमदार बच्चु कडू यांनी राऊत यांच्यावर टीका केली. प्रहार आंदोलनाच्या निमित्ताने आमदार बच्चु कडू नागपूरमध्ये प्रसार माध्यांशी बोलत होते.
हेही वाचा >>> “शेतकऱ्यांच्या जमिनी लिलावात घेणाऱ्यांचे हातपाय तोडू”; बच्चू कडूंचा इशारा…
राजकीय पक्ष फोडण्यासाठी भाजपने दुसऱ्या पक्षातील आणि अपक्ष आमदारांना एजंट म्हणून नियुक्त केले, असा आरोप संजय राऊत यांनी केला होता. त्यावर प्रतिक्रिया देताना बच्चू कडू म्हणाले, संजय राऊत यांनी एक तरी एजंटचं नाव सांगावे. त्यांनी केलेले आरोप बिनबुडाचे आहे. सध्या त्यांचे मानसिक संतुलन बिघडले असून त्यांच्या मेंदूचा केमिकल लोचा झाला आहे अशी टीका बच्चु कडू यांनी केली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यवस्थित अभ्यास करून न्यायालयात बाजू मांडली आहे. त्यामुळे राऊत यांनी प्रथम अभ्यास करावा आणि त्यानंतर बोलावे असेही कडू म्हणाले.