छत्रपती ते जयताळा-त्रिमूर्तीनगर-सुभाषनगर चौक
केंद्राने शहरातील २३ अपघात स्थळांच्या विकासासाठी सात कोटी १० लाख रुपयांचा निधी दिला आहे. एवढेच नव्हे तर रस्ते बांधकामाचा एक टक्का निधी या स्थळांच्या दुरुस्तीवर खर्च करण्यात येणार आहे. सुमारे पाच कोटी रुपयांचा हा निधी आहे. शहरातील अपघातांचे प्रमाण तीन वर्षांत निम्म्याहून खाली आणण्याचे वचन देताना केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी तब्बल दीड वर्षांपूर्वी नागपूरकरांना ही माहिती दिली. त्यातील दीड वर्ष निघून गेले असून उर्वरित दीड वर्षांत अपघातांवर नियंत्रण येईल, अशी परिस्थिती सध्यातरी दिसून येत नाही. छत्रपती ते जयताळा चौकादरम्यान त्रिमूर्तीनगर, सुभाषनगर चौकसुद्धा अपघातग्रस्त चौक ठरलेले आहेत, तर त्याचवेळी राजीवनगर चौकात अलीकडेच झालेल्या दोन अपघातांनी गडकरींच्या वचनावर प्रश्नचिन्ह उभे केले आहे.
राजीवनगर चौक
काही दिवसांपूर्वीच राजीवनगर चौकात रुग्णालयात जाणाऱ्या दाम्पत्याला ट्रकने चिरडले. मेट्रोच्या कामामुळे रस्ता अरुंद झाला असून खड्डेही खूप आहेत. बसथांब्याजवळील दारू दुकानाजवळ मद्यपिंची गर्दी असते. दुकानासमोरच वळणमार्ग असल्यामुळे कित्येकदा वाहने समोरासमोर येतात. वाहनांचा थांबासुद्धा याठिकाणीच आहे. शाळांच्या खासगी बसेसही येथेच थांबतात. त्यामुळे शाळा सुटण्याच्या वेळी परिस्थिती आणखीच बिकट होते.
छत्रपती चौक
वर्धा मार्गावर जाण्यासाठी छत्रपती चौकातून दररोज ३५० ते ४०० एसटी बसेस, २०० खासगी बसेस धावतात. चौकाला लागूनच एसटीचा थांबा आहे आणि खासगी बसेससुद्धा तेथेच थांबतात. त्यामुळे येथे मोठी गर्दी असते. एसटी आणि खासगी बसेसची रांग बरेचदा चौकापर्यंत पोहोचते. उड्डाणपूल तोडल्याने जड व इतरही वाहनांची गर्दी वाढली. ‘ओव्हरटेक’ करण्याच्या स्पध्रेमुळे येथे अपघाताचा धोका आहे. तीन वर्षांपूर्वी या चौकात एसटी आणि रुग्णवाहिका यांची धडक झाली होती. चौकातून दोन दिशेने जाणाऱ्या रिंगरोडलगत नागरी वस्त्या झाल्याने जड वाहतुकीमुळे छोटेमोठे अपघात घडून येत आहेत. सकाळी ६.३० ते ११.३० आणि दुपारी ४ ते रात्री ९ या वेळात जड वाहनांना रिंगरोडवर बंदी असतानाही ही वाहने सर्रास या काळात धावतात.
त्रिमूर्तीनगर चौक
रिंगरोडला लागून असणारा त्रिमूर्तीनगर चौक अपघातस्थळ ठरलेले आहे. चौकातील उद्यानाजवळ पूल आहे. हा रस्ता एका बाजूने बंद असतो. त्या आधीच्या संभाजी चौकात बॅरिकेट्स लावून असतात. त्यामुळे रस्ता सुरू की बंद, असा संभ्रम होतो आणि येथेच गफलत होऊन वाहने परस्परांवर धडकतात. अर्धवट काम झालेल्या या रस्त्यावर पथदिवेसुद्धा नाहीत, त्यामुळे रात्री वाहनधारकांची तारांबळ उडते. सिमेंट रस्ते होऊनही मुख्य चौकात ‘फिनिशिंग’ झाले नाही. बांधकामादरम्यान तुटलेल्या वायर्स जोडण्यात आल्या नाही. त्यामुळे पथदिवे बंदच असतात.
सुभाषनगर चौक
सुभाषनगर चौक अपघाताच्या दृष्टीने अतिशय धोकादायक ठरला आहे. बर्डी, प्रतापनगर आणि हिंगणा अशा तिनही ठिकाणाहून येणाऱ्या वाहतुकीला हा चौक पार करावा लागतो. ३०-४० वर्षांपूर्वी वर्दळ कमी होती. आता हिंगण्याला जाणारी वाहने तसेच काही अभियांत्रिकी महाविद्यालयाचा हा मार्ग असल्यामुळे सकाळी ७ ते ८ तसेच सकाळी १० ते ११ वाजताच्या सुमारास वर्दळ वाढते. गजानन मंदिर ते विवेकानंद स्मारकाजवळ उतार असल्यामुळे बरेचदा अंबाझरीकडून आणि प्रतापनगरकडून येणारी वाहने धडकतात. स्मारक झाल्यानंतर गर्दी वाढल्यामुळे हा धोका आणखी वाढला आहे. चौकातील वाहतूक दिवे शोभेची वस्तू ठरले आहेत. आता मेट्रोच्या कामामुळे रस्त्यांची आणि वाहनधारकांची गळचेपी झाली आहे.
जयताळा चौक
मंगलमूर्ती चौक ते जयताळाकडे जाणाऱ्या रस्त्यावर रेल्वे क्रॉसिंगच्या जागेत दर रविवारी बाजार भरतो. मटण मार्केटही येथेच भरते. लोकं रस्त्यावरच वाहने उभी करतात. चौकात वाहतूक दिवे नाहीत. सायंकाळी एक-एक तास वाहतूक कोंडी सुटत नाही. नवीन जयताळा चौकात वाहतूक दिवे लावण्यात आले होते. पण, सिमेंट रस्त्याच्या कामानंतर ते बंद पडले ते अजून सुरू झाले नाहीत.
याठिकाणी वाहतूक दिवे लावण्याची मागणी अनेकदा करण्यात आली, पण एवढा जुना चौक असूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. जुन्या जयताळा चौकात निदान गर्दीच्या वेळी वाहतूक पोलीस तरी नियुक्त करावा.
– राजेश बिसेन, फूलविक्रेते
चौकातील वाहतूक दिवे बंद आहेत. वाहतूक पोलीसही येथे नसतो आणि मग चारही दिशेने वाहने समोरासमोर येतात.