सुमित पाकलवार
गडचिरोली : नक्षलवाद्यांच्या कारवायांमुळे कायम दहशतीत राहणाऱ्या दक्षिण गडचिरोलीतील दंडकारण्य परिसरात रस्ता बांधकाम आणि खाणीवरून असंतोषाची ठिणगी पडली आहे. मागील पंधरा दिवसांपासून तोडगट्टा येथे सुरू असलेल्या आंदोलनाने मोठे स्वरूप घेत प्रशासन जोपर्यंत इथे येऊन आमच्याशी संवाद साधणार नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार, असा इशारा दिला आहे. रविवारी आंदोलनस्थळी आसपासच्या ग्रामसभेतील पाच हजाराहून अधिक आदिवासी नागरिकांनी उपस्थिती दर्शवली होती.
एटापल्ली तालुक्यातील नक्षलग्रस्त म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तोडगट्टा या गावात मागील पंधरा दिवसांपासून प्रशासनाविरोधात आंदोलन सुरू आहे. छत्तीसगड आणि महाराष्ट्राच्या सीमेवर सुरू असलेले रस्ता बांधकाम बंद करण्यात यावे, ही येथील आदिवासींची मुख्य मागणी आहे. त्यांच्यामते या परिसरातील दमकोंडवाही येथील प्रस्तावीत लोहखाण सुरू करण्यासाठी प्रशासनाने पूर्व तयारी सुरू केली आहे. त्यामुळे गट्टा ते तोडगट्टा आणि पुढे छत्तीसगडला जोडणारा रस्ता बांधण्यात येऊ नये, असे आंदोलकांचे म्हणणे आहे. दमकोंडवाही बचाव कृती समिती आणि पारंपरिक सूरजागड इलाका समिती या आंदोलनाचे नेतृत्व करीत आहे.
हेही वाचा >>> गोंदिया : लग्न दारात अन नवरदेव स्वच्छता अभियानात, नागरिकांकडून कौतुक
रविवारी शहीद दिवसाचे औचित्य साधून येथे एक मोठा कार्यक्रम घेण्यात आला. यात सूरजागड इलाक्यातील ७० आणि लगतच्या छत्तीसगड येथील ३० ग्रामसभेतील प्रतिनिधी तसेच नागरिक उपस्थित होते. यावेळी काही प्रतिनिधींची भाषणेसुद्धा झाली. यात पेसा व ग्रामसभा अधिकारांबाबत चर्चा देखील झाली. आंदोलन करणाऱ्या प्रत्येकाला प्रशासन नक्षलवादी ठरवीत आहे, असा नाराजीचा सूर देखील कार्यक्रमात उमटला. शासनाला खरंच या परिसराचा विकास करायचा असेल तर आधी शिक्षण, आरोग्य सारख्या सुविधा निर्माण कराव्या. पण केवळ खाणीसाठी ते रस्ता निर्माण करून हा परिसर उद्ध्वस्त करणार, असा आरोप यावेळी करण्यात आला. प्रशासन आमच्यापर्यंत येऊन चर्चा करणार नाही. तोपर्यंत हे आंदोलन असेच सुरू राहणार असा इशारा देण्यात आला आहे.
खाणीचा प्रस्तावच नाही
दमकोंडवाही खाणीसंदर्भात शासन दरबारी कुठलाही प्रस्ताव नाही. त्यामुळे हा रस्ता नागरिकांच्या सुविधेसाठी निर्माण करण्यात येत आहे. यामुळे परिसराला मुख्य प्रवाहात जोडण्यास सहाय्य होणार आहे. रस्त्यामुळे नक्षलवाद्यांची चारही बाजूने कोंडी होणार आहे. त्यामुळे नागरिकांना धमकावून नक्षलवाद्यांनी हे आंदोलन उभे केल्याचे दिसून येते. असे पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.
मार्गावर नर्मदाक्काचे स्मारक
जहाल महिला नक्षलवादी नेता नर्मदा हीचे मागील वर्षी निधन झाले. तिने सर्वाधिक काळ तोडगट्टा परिसरात घालवला आहे. संवेदनशील असल्याने या भागात आजही पोलिसांना पोहोचण्यास अडचण निर्माण होते. त्याच गट्टा ते तोडगट्टा मार्गावर रस्त्याच्या कडेला नर्मदाक्काचे स्मारक बांधण्यात आले आहे. काही अंतरावर सुजाता हिचे लहान स्मारकसुद्धा दिसून आले.