नागपूर : शहरातील सर्वाधिक वर्दळीचा चौक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अजनी चौकातील माऊंट कार्मेल शाळेतील विद्यार्थिनींची धोकादायक पायपीट सुरू आहे. शाळेला लागून असलेल्या गजबजलेल्या चौकातून मुलींना शाळेची वाट काढावी लागते. त्यामुळे पालकांचा जीव सतत टांगणीला लागलेला असतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अजनी चौकातून अन्न महामंडळाच्या गोदामाकडे (एफसीआय) जाणाऱ्या रस्त्यावर माऊंट कार्मेल ही मुलींची शाळा आहे. जवळपास हजारांवर मुली येथे शिक्षण घेतात. या शाळेचे मुख्य प्रवेशद्वार अजनी चौकातील एका मुख्य रस्त्यावर उघडते. शाळेत जाताना अजनी चौकाचा धोका पार करावा लागतो. तसेच शाळेतून बाहेर निघताच थेट मुख्य रस्त्याच्या कडेला उभे राहावे लागते. या शाळेच्या बसेस आणि स्कुलव्हॅन अगदी रस्त्यावरच उभ्या असतात. ऑटोचालकसुद्धा मुलींना रस्त्यावरच सोडून देतात. सकाळी ९ च्या सुमारास आणि शाळा सुटताना अडीचच्या सुमारास शाळेसमोर मोठी गर्दी होते. या रस्त्यावर सतत भरधाव वाहने धावत असतात. तसेच एफसीआय गोदामामुळे जड वाहनेसुद्धा दिवसभर येत असतात. त्यामुळे विद्यार्थिनींना जीव मुठीत घेऊनच शाळेत जावे लागते.

आणखी वाचा-पावसाचे संकट आणखी गडद होणार!; वादळी वारा अन् विजांच्या कडकडाटासह…

ऑटोचालकांचा विळखा

माऊंट कार्मेल शाळेच्या अगदी प्रवेशद्वारासमोर ऑटोचालकांची गर्दी दिसते. अजनी चौकातून मेडिकल चौक किंवा सीताबर्डीकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी शाळेच्या प्रवेशद्वारासमोरच ऑटो उभे केले जातात. यामुळेही विद्यार्थिनींना असुरक्षित वाटते.

चारही बाजूंनी अतिक्रमण

अजनी चौकात सर्वाधिक दुकाने वाहने दुरुस्त करणाऱ्यांची आहेत. त्यामुळे रस्त्याच्या कडेलाच दुरुस्तीसाठी आलेली वाहने उभी केली जातात. तसेच मेट्रो स्टेशनसाठी तयार करण्यात आलेल्या स्कायवॉकची सुरुवातही शाळेच्या जवळूनच होते. त्यामुळे मेट्रोच्या प्रवाशांचीही गर्दी या ठिकाणी असते. तसेच रस्त्यावर हातठेल्यांनी अतिक्रमण केले आहे. रस्त्यावरच पाणीपुरी किंवा किरकोळ सामान विक्रेते दिवसभर बसलेले असतात.

आणखी वाचा-नागपूर : मंकीपॉक्स वाढतोय.. पण राज्यात आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी प्रतिबंधात्मक लस नाही…

नागरिक काय म्हणतात?

शाळेसमोर मोकळी जागा नसल्यामुळे विद्यार्थी रस्त्यावरच गोळा होतात. भरधाव वाहनांची वर्दळ जास्त असल्यामुळे अपघाताचा धोका सतत असतोच. तो टाळण्यासाठी शाळा प्रशासन आणि वाहतूक पोलिसांनी योग्य समन्वय साधावा. -विलास मेश्राम, कारचालक.

पोलीस काय म्हणतात?

अजनी चौकात वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून दोन वाहतूक पोलीस तैनात करण्यात येतील. तसेच रस्त्यावर उभ्या केलेल्या ऑटोंवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल. शाळा प्रशासनाशी चर्चा करून तोडगा काढला जाईल. -कल्पना बाविस्कर, सहायक पोलीस आयुक्त, वाहतूक शाखा.