भंडारा : भंडारा ते भंडारा रोड रेल्वेस्थानकापर्यंत दररोज शेकडो नागरिक प्रवास करतात. मात्र, या मार्गाने जाताना जीव मुठीत घेऊनच प्रवास करावा लागतो. या मार्गावर दररोज अपघात होत असून अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. या गंभीर बाबीकडे प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्याकरिता परिसरातील त्रस्त प्रवासी, सामाजिक कार्यकर्ते व ऑटो रिक्षा चालक-मालक संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी युवा सामाजिक कार्यकर्ते कृष्णा भुजबळ यांच्या वाढदिवसानिमित्त दाभा मार्गावरील मोठमोठय़ा खड्डय़ांमध्ये वृक्षारोपण करत खड्डय़ांमध्ये बसून केक कापून अनोख्या पद्धतीने आंदोलन केले.
या महामार्गावर मोठमोठे खड्डे पडलेले असून जामिनी ते वरठी मार्गावर जीवघेणे खड्डे आहेत. रस्ता दुरुस्तीसठी वारंवार निवेदन देण्यात आले. मात्र प्रशासनाकडून त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप करीत आंदोलन करण्यात आले. यावेळी हेमंत रघुते, गोवर्धन निनावे, सुधीर सार्वे, इस्तारी, ज्ञानेश्वर वैद्य, अजय रामटेके, ज्येष्ठ नागरिक गणेश पिपरोडे, कवडू घुले, दामोदर हुमने, सूर्यवंशी व सर्व त्रस्त प्रवासी, परिसरातील सामान्य नागरिक उपस्थित होते.