• महापौरांच्या निर्देशांना केराची टोपली
  • धोकादायक खड्डय़ांबाबत अनभिज्ञता

पावसाचे पाणी साचून अपघात होऊ नये म्हणून पावसाळ्यात वाहतुकीच्या ठिकाणी खोदकाम करण्यास बंदी असते आणि असलेले खड्डे बुजण्याचे बंधनकारक असलेतरी नागपूर शहर यास अपवाद ठरले आहे. महापौर प्रवीण दटके यांच्या निर्देशानंतरही शहरात ठिकठिकाणी खोदकाम सुरूच आहेत.

दरवर्षी साधारणत: जूनच्या शेवटच्या आठवडय़ापूर्वी खोदकाम बंद करण्यात येते. त्यासाठी मान्सूनपूर्व तयारीचा आढावा घेण्याची पद्धत रूढ झाली आहे. पावसाचा संभावित परिणाम आणि त्यावरील उपाययोजनांच्या तयारीचा हा भाग असतो. पावसाचे पाणी सखल भागातील वस्त्यांमध्ये शिरून हानी होते. तसेच खोदकाम झालेल्या ठिकाणी पाणी साचून अपघात होतात. खड्डय़ात पडून मृत्य ओढवण्याची भीती असते. अशा घटना शहरात घडलेल्या आहेत. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाय म्हणून पावसाळ्यात जलवाहिन्या टाकण्यासाठी असो वा केबल टाकण्यासाठी रस्ते खोदण्यास मनाई करण्यात येते. यावर्षी महापौरांनी १५ जूनला बैठक घेतली. पावसाळा तोंडावर असल्याने ओसीडब्ल्यूने रस्त्यावर खोदून ठेवलेले सर्व खड्डे २० जूनपर्यंत बुजवावे, असे निर्देश दिले. मात्र, ओसीडब्ल्यूने अनेक वस्त्यांमधील खड्डे बुजवले नाहीत. जलवाहिन्या टाकण्यासाठी खोदकाम केल्यानंतर तेथील अतिरिक्त माती देखील दुसरेकडे हलवली नाही. मेट्रो रेल्वेसाठी स्तंभ उभारण्यापूर्वी माती परीक्षणासाठी खड्डे खोदण्यात आले. ते नीट बुजवण्यात आले नाही. त्यामुळे जडवाहनांच्या भारामुळे तेथे खड्डे पडले आहेत.

शहरात सिमेंट रस्त्यांची कामे सुरू आहेत. त्यासाठी त्या रस्त्यांवरील वाहतूक बंद ठेवण्यात येते. त्यामुळे पावसाळ्यातही तेथे काम असलेतरी फार फरक पडत नाही. परंतु वाहतूक असलेल्या भागात खोदकाम केले जाणे, खड्डे करून ठेवणे पावसाळ्यात धोकादायक आहे.

जगनाडे चौक ते केडीके अभियांत्रिकी महाविद्यालय यादरम्यान सिमेंट रस्ता  खोदण्यात आला आहे. हा रस्ता पाच वर्षांपूर्वी तयार करण्यात आला होता. नंदनवन कॉलनीत पावसाचे पाणी साचत असल्याने सिमेंट रस्ता तोडून नंदनवन कॉलनी ते नागनदी अशी पावसाचे पाणी वाहून नेण्यासाठी वाहिनी करण्यात येत आहे. अगदी पावसाळ्याच्या तोंडावर हे काम सुरू आहे.

शून्य मैलाचा दगड, गोवारी स्मारक ते वन खात्याच्या कार्यालयादरम्यान केबल टाकण्यासाठी रस्ता खोदण्यात आला आहे. याकडे लक्ष मुख्य अभियंता उल्हास देबडवार यांनी ते काम ताबडतोब बंद करण्यात येईल, असे सांगितले. मलवाहिन्या तुंबल्यामुळे, मलवाहिन्यांचे चेम्बर किंवा इतर ठिकाणी खोदकाम करावे. हे अत्यावश्यक काम करताना नीट बॅरेकेटिंग केली जाते. महापौरांनी सिमेंट रोड, मेट्रो रेल्वे आदी काम सोडून सर्वसाधारण सर्व खोदकाम बंद करण्याचे निर्देश दिले, असे ते म्हणाले.

खोदकाम सुरू असलेली ठिकाणे

  • शून्य मैलाचा दगड परिसरात केबल टाकण्यासाठी खोदकाम सुरू आहे.
  • लोकसत्ता कार्यालयाच्या मागे उंटखानात रस्त्यांवर खोदकाम करण्यात आले आहे.
  • आयुर्वेदिक ले-आऊटमध्ये विजेचे खांब उभे करण्यासाठी खोदकाम करण्यात आले आहे.
  • श्रीनगरमध्ये ओसीडब्ल्यूने खोदकाम केले. पावसाला सुरुवात झाली तरी खड्डे बुजवण्यात आले नाही आणि मातीही उचलण्यात आलेली नाही.
  • विश्वकर्मानगरात ओसीडब्ल्यूने मोठा खड्डा खोदून ठेवला आहे.
  • नंदनवन कॉलनीत साचलेले पावसाचे पाणी काढण्यासाठी सिमेंट रस्ता खोदण्यात येत आहे.

खोदकाम ताबडतोब थांबवू

पावसाळ्यापूर्वी झालेले खोदकाम बुजवले जावे आणि पावसाळ्यात खोदकाम केले जाऊ नये. अत्यावश्यक असल्यास व्यवस्थित ‘बॅरेकेटिंग’ करून ते कामे करणे अपेक्षित आहे. महापौरांच्या निर्देशांचे पालन केले जाईल. शून्य मैलाचा दगड परिसरातील खोदकाम ताबडतोब बंद करण्यात येईल.

– उल्हास देबडवार, मुख्य अभियंता, नागपूर महापालिका.