३९० पैकी केवळ १३ रस्त्यांचीच कामे सुरू

वाढती  लोकसंख्या, त्यानुसार वाढणारी वाहन संख्या आदी बाबी पुढील २० वर्षांसाठी  लक्षात घेऊन विकास आराखडय़ात रस्ते प्रस्तावित केले जात असतात. त्यानुसार महापालिकेने आराखडय़ात ३९० रस्त्यांचे नियोजन केले  होते. मात्र, त्यापैकी १३ रस्त्यांची कामे हाती घेण्याचे ठरले. त्यातील काही रस्त्यांचे काम सुरू झाले आहेत, तर बहुप्रतिक्षित वंजारीनगर ते अजनी रेल्वेपूल या रस्त्यांच्या कामाला अद्याप सुरुवातही झालेली नाही.

दक्षिण व पश्चिम नागपूरला जोडणारा हा रस्ता ठरू शकतो. तो विकास आराखडय़ात आहे. रेल्वेची जागा हवी असल्याने अडचण आली. रस्त्यासाठी आवश्यक जागेवर बांधकाम केले. त्यावर महापालिकेने आक्षेप घेतला. त्यानंतर महापालिका आणि रेल्वेने संयुक्त पाहणी केली. त्याचा अहवाल सिटी सव्‍‌र्हेला पाठवण्यात आला आहे. मात्र, रस्त्याचे काम होऊ शकलेले नाही.

महापालिका क्षेत्राकरिता विकास नियंत्रण नियमावली महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम १९६६ नुसार शासन अधिसूचना ३१ मार्च २००१ ला काढण्यात आली.

नगररचना विभागाच्या २७ फेब्रुवारी २००२ च्या अधिसूचनेनुसार सात योजनांकरिता नागपूर सुधार प्रन्यास आणि नागपूर महापालिकेला नियोजन प्राधिकरण म्हणून घोषित केले. महापालिकेकडे २८९ आणि नागपूर सुधार प्रन्यासकडे १०१ डीपी रोड आहेत. त्यापैकी महापालिकेतील  १९४ विकसित, ५६ अर्धविकसित आणि ३९ अविकसित रस्ते आहेत. नासुप्रकडे सात रस्ते विकसित, ४२ अर्धविकसित आणि ५२ अविकसित आहेत.

महापालिकेने १३ रस्ते विकसित करण्याचे ठरले, परंतु काही रस्ते सरकारी खात्यांच्या जागेतून  टाकायचे आहे. त्यासाठी परवानगी मिळण्यास अडचणी येत आहेत, तर अनेक ठिकाणी रस्त्याचे नियोजन करण्यात आले, परंतु त्याची निविदा देखील काढण्यात आली नाही तर काही कार्यादेशाच्या प्रक्रियेत आहेत. सध्या महापालिकेने विकास आराखडय़ातील तीन रस्त्यांचे बांधकाम सुरू केले आहे. तसेच ७ रस्त्यांचे काम प्रकल्प प्रलंबित आहे.

यासंदर्भात महापालिकेचे कार्यकारी अभियंता राजेश भुतकर म्हणाले, सध्या १३ कामे हाती घेण्यात आली आहेत. आवश्यकतेनुसार टप्प्याटप्प्याने उर्वरित रस्त्यांची कामे केले जातील.

वंजारीनगर पाण्याची टाकी ते अजनी रेल्वे उड्डाण पूल असा ३० मीटर रस्ता प्रस्तावित आहे. याबाबत प्रत्येक बैठकीत चर्चा केली जाते. गेल्या आवठय़ात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महापालिकेत आढावा बैठक घेतली. यावेळी सुद्धा या रस्त्यांचे काम तातडीने करण्याची सूचना देण्यात आली. मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक यावेळी देखील उपस्थित होते.

अजनी उड्डाण पूल आणि टीव्ही डी.बी. वार्डकडून येणारी सर्व वाहतूक वंजारीनगर वस्तीतून तुकडोजी पुतळ्याकडे निघू लागले आहे. त्यामुळे या मार्गावर प्रचंड ताण निर्माण झाला असून दररोज अपघात होत आहे. आधी अजनी उड्डाण पुलाकडून तुकडोजी पुतळ्याकडे रस्ता निघत होता. रेल्वेने तो रस्ता बंद केल्याने वाहतूक कोंडी होत आहे. वंजारीनगर ते अजनी रेल्वे उड्डाण पूल हा रस्ता होणे आवश्यक आहे.

– डॉ. त्र्यंबक बांदरे, वंजारीनगर

हे रस्ते होणार

१) मॉरिस कॉलेज टी पाईंट-विज्ञान संस्था २) उत्तर अंबाझरी मार्ग, मातृसेवा संघ – अमरावती मार्ग, ३) महाराजबाग चौक ते विद्यापीठ ग्रंथालयदरम्यान पुलाचे काम ४) अजनी रेल्वे मेन्स स्कूल ते वंजारीनगर , ५) केळीबाग रोड, ६) हजारी पहाड, ७) अजनी रेल्वे ते रहाटे कॉलनी, ८) गीतांजली चौक ते गांधीसागर तलाव ९) मॉडेल मिल ते रामजी पहिलवान चौक,१०) वाठोडा, ११) जुना भंडारा रोड, १२) पिवळी मारबत रस्ता, १३) पशुवैद्यकीय महाविद्यालय ते गोरखेडे कॉम्प्लेक्स