देशातील रस्ते आता सर्वसामान्य नागरिकांच्या विमा, भविष्य निर्वाह निधीच्या पैशातून बनवले जाणार आहेत, अशी माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. विदर्भ साहित्य संघाच्या अमेय सभागृहात शनिवारी झालेल्या ‘यश आपयश’ भाग ३ या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात ते बोलत होते. याप्रसंगी मंचावर सामाजिक कार्यकर्ते डॉ. गिरीश गांधी, दत्ता मेघे अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वेदप्रकाश मिश्रा, विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष प्रदीप दाते, लाखे प्रकाशनचे चंद्रकांत लाखे, अजय कुलकर्णी उपस्थित होते.
हेही वाचा >>> राजकारणातील ताण घालवण्यासाठी केजरीवाल करणार विपश्यना; दहा दिवसांसाठी नागपुरात दाखल
गडकरी पुढे म्हणाले, देशात कोटयवधी रुपयांच्या रस्त्यांचे काम सुरू आहेत. पूर्वी रस्ते तयार करण्यासाठी विदेशी गुंतवणुकीची गरज भासायची. आता देशातील सर्वसामान्य लोकांच्या मदतीने रस्ते तयार केले जात आहेत. पैसे उभारण्यासाठी नुकतेच इनबीट माॅडेल सुरू केले आहे. त्यातून बाजारात बाॅन्डच्या मदतीने पैसे उभारले जातात. पहिल्या टप्प्यात त्याला यश मिळाले आहे. या पद्धतीत शेतकरी, शेतमजूर असे कुणालाही पैसे गुंतवता येतात. त्यातून संबंधितांना महिन्याला ८ टक्के परतावा दिला जातो. बँकेकडून ४ ते ५ टक्केहून अधिक व्याज दिले जात नसताना या पद्धतीत नागरिकांना ८ टक्के परतावा महिन्याला मिळत असल्याने आता देशात नागरिकांच्या विमा, भविष्य निर्वाह निधीच्या पैशातून हे रस्ते तयार केले जातील, असेही गडकरी म्हणाले.