लोकसत्ता टीम

यवतमाळ : व्यवसायिकाच्या घरात घुसून बंदुकीच्या धाकावर भर दिवसा लुटमार करण्यात आली. सोने, चांदी, मोठी रोकड असा लाखोंचा ऐवज दरोडेखोरांनी लंपास केला.

दरोड्याच्या या घटनेने जिल्ह्यातील दारव्हा शहरात प्रचंड खळबळ उडाली. आज मंगळवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. दारव्हा येथील बारी पुरा येथे राम मंदिराजवळ राहणारे किराणा व्यवसायिक गणेश वसंतराव काळबांडे यांच्या घरी काही तरूण चारचाकी वाहन (क्र. एमएच २४, बीएल ६२४२) ने आले.

घरात घुसून बंदुकीच्या धाकावर घरातील महिलांना धमकावले. एका तरूणाने महिलेवर बंदूक ताणली. तर दुसऱ्या तरूणाने घरातील दुसऱ्या महिलेच्या गळ्याला चाकू लावला. दोघींचेही हातपाय दोरखंडाने बांधून डोळ्यावर पट्टी बांधली. त्यानंतर घरातून रोख, सोने व चांदी असा लाखो रुपयांचा मुद्देमाल लुटला. गणेश काळबांडे यांचे ‘बळीराम पुंजाजी काळबांडे’ या नावाने शहरातील अतिशय जुने किराणा प्रतिष्ठान आहे.

स्कॉर्पिओ वाहनाने आलेले सात दरोडेखोर गणेश बाळबांडे यांच्या घरात घुसले. काही कळायच्या आत घरात असलेल्या दोन महिलांच्या तोंडावर पट्टी बांधली. त्यानंतर एका महिलेवर बंदूक रोखली, दुसऱ्या महिलेच्या गळ्यावर चाकू लावला. दोरखंडाने महिलांचे हात पाय बांधून ठेवले. त्यानंतर घरातून चार लाख रुपये रोख, २५ तोळे सोने, दोन किलो चांदी असा ३० ते ३५ लाख रुपयांचा मुद्देमाल लुटला.

चारचाकी वाहनातून दरोडेखोरांनी पोबारा केला. दरम्यान काळबांडे हे दुकानातून दुपारी घरी जेवण करण्यासाठी घरी आल्यानंतर हा खळबळजनक प्रकार उघडकीस आला. या घटनेची वार्ता परिसरात पसरताच नागरिकांनी त्यांच्या घरी एकच गर्दी केली. घटनेची माहिती मिळताच दारव्हा पोलीसांनी घटनास्थळ गाठले.

दारव्हा उपविभागीय पोलीस अधिकारी रजनीकांत चिलमुल्ला, पुसदचे उपविभागीय पोलीस अधिकारी हर्षवर्धन बी.जे., स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक सतीश चवरे, आदींनी घटनास्थळी भेट दिली. अटक करण्यात आलेले पाचही आरोपी मराठवाड्यातील आहेत. त्यांनी दारव्हा येथे काळबांडे यांच्या घराची रेकी करून हा दरोडा टाकल्याची शंका आहे. दुपारच्या वेळी घरात महिलाच असतात, हे हेरून हा दरोडा टाकण्यात आला. अधिक तपास दारव्हा पोलीस करत आहे.

सिनेस्टाईल पाठलाग

दारव्हा येथे दरोडा टाकून चारकचाकी वाहनाने पसार झालेल्या दरोडेखोरांना अटक करण्यासाठी जिल्ह्यात सर्वत्र नांकेबंदी करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेसह अन्य पोलीस पथक विविध ठिकाणी रवाना झाले. दरम्यान पोलीस मागावर असल्याची भनक लागल्याने दरोडेखोरांनी पुसद तालुक्यातील शेंबाळपिंप्री शिवारात नाकेबंदी दिसताच रस्त्याच्या कडेला वाहन उभे करून शेतातून पसार होण्याचा प्रयत्न केला.

खंडाळा पोलिसांना ही बाब लक्षात येताच त्यांनी दरोडेखोरांचा पाच किमी सिनेस्टाईल पाठलाग करुन पाच आरोपींना जेरबंद केले. दोघेजण मात्र पसार झाले. अटक केलेल्यांमध्ये अश्रफ परवेज खान, महेश रामप्रसाद पिंपरणे, आदर्श देवी सिंग बिडला, कार्तिक रमेश डुलकेजा, गणेश शाम कोटूरवार सर्व रा. नांदेड अशी आरोपींची नावे आहेत. दाने फरार आरोपींची नावे कळू शकली नाही.