घुग्गुस- चंद्रपूर मार्गावरील औद्योगिक वसाहतीतील (एमआयडीसी) स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेत सोमवारी सकाळी दरोड्याची घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. दरोडेखोरांनी बँक फोडून १४ लाखाची रोकड पळवली आहे. पडोली पोलिस ठाण्याचे अंतर्गत बँकेची ही शाखा येते. शनिवार व रविवार अशा सलग दोन दिवस सुटी असल्याने ही बँक बंद होती. सुरक्षा रक्षक असेल तरी दरोडेखोरांनी पाळत ठेवत शनिवार कीवा रविवारच्या मध्य रात्री डाव साधला. दरोडेखोरांनी बँक फोडून बँकेचे लॉकर तोडत चोरांनी त्यामध्ये ठेवलेली १४ लाखांची रोकड पळवली. आज सकाळी बँक उघडल्यानंतर ही घटना उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच पडोली पोलीस, स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी बँकेत धाव घेत बँकेतील सीसीटीव्ही चे फुटेज तपासण्याचे काम सुरू केले आहे.
हेही वाचा >>>नागपूर: परीक्षेच्या काळात मुले अभ्यासाचा कंटाळा करतात; पालकांनो ही युक्ती वापरून बघा
नुकतेच पडोली पोलीस स्टेशनमध्ये पोलीस निरीक्षक सुनीलसिंग पवार हे रुजू झाले होते, त्यासोबत पडोली पोलीस स्टेशनमधून स्थानिक गुन्हे शाखेत रुजू झालेले पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांना दरोडेखोरांनी सदर गुन्हा करीत सलामी दिली आहे. या घटनेमुळे बँकेच्या वर्तुळात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे मागील महिनाभरातील ही तिसरी मोठी चोरी आहे. यापूर्वीच्या दोन चोऱ्यांमध्ये चोरट्याने ३५ ते ४० तोळे सोने पुदुलवार यांच्या विवाह सोहळ्यातून तसेच बोंनगिरवार यांच्या घरून चोरून नेले. दोन्ही चोरांचा शोध घेण्यात पोलिस अपयशी ठरले आहे.