नागपूर: कर्जत- जमखेडमध्ये एमआयडीसी होऊ नये म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमदार राम शिंदे यांचा उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यावर दबाव आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार (शरद पवार गट) यांनी विधानभवन परिसरात प्रसिद्धिमध्यमांशी बोलताना दिली. रोहित पवार यांनी एमआयडीसीबाबत घातलेले जॅकेट याप्रसंगी सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. त्यावर काही मजकूरही होता.
रोहित पवार म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना याबाबत निवेदन दिले आहे. त्यांनी व उद्योगमंत्री उदय सामंत यांनी त्यावर सकारात्मकताही दाखवली होती. त्यामुळे आता मुख्यमंत्री निर्णय घेण्यात मोठे की उपमुख्यमंत्री फडणवीस हे स्पष्ट होईल, असेही पवार म्हणाले.
हेही वाचा – राज्यातील पहिला ‘हत्ती कॅम्प’ वनखात्याला नकोसा! हत्ती हलविण्याच्या हालचालींना पुन्हा वेग
कर्जत-जामखेड येथे औद्योगिक क्षेत्रासाठी निश्चित केलेली जमीन नीरव मोदी यांची असल्याचा माजी मंत्री राम शिंदे यांनी आरोप लावला आहे. आमदार रोहित पवार यांनी हा आरोप खोडून काढत, हिंमत असल्यास संबंधित जमिनीची सर्व कागदपत्रे घेऊन समोरासमोर चर्चा करण्याचे आव्हानही केले.
हेही वाचा – कर्तव्यावर असताना एक पाय गमावला, पण पाच किलोमीटरची मॅराथॉन…
आम्ही जमखेडमध्ये एमआयडीसीसाठी संपूर्ण जागेची पाहणी करून ४५० हेक्टर जागा निश्चित केली आहे. तिथे मोठ्या कंपन्या याव्यात आणि त्या माध्यमातून २० हजार युवकांना रोजगार मिळावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यानुषंगाने दोन महामार्ग तयार करण्याच्या प्रयत्नांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या सहकार्यामुळे यश आले आहे. निश्चित केलेल्या जागेला कुणाचाही विरोध नाही. एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनीदेखील ती जागा योग्य असल्याचे म्हटले आहे. त्या जागेसंदर्भात ग्रामपंचायतीने ठराव पारित केला आहे. केवळ या औद्योगिक क्षेत्रापोटी बागायती जमीन जाऊ नये, अशी मागणी ग्रामपंचायतने केली होती. त्यानुसार तेवढी बागायती जमीन सोडण्यात आली आहे. परिणामत: राम शिंदे यांनी लावलेल्या आरोपांमध्ये काहीही तथ्य नाही. त्यांनी हिंमत असेल तर कधीही यावे. मी ती जमीन नीरव मोदींची आहे की नाही याबाबत चर्चा करायला तयार असल्याचेही पवार म्हणाले.