नागपूर: भारतीय जनता पक्षाने (भाजप) खतांच्या पिशव्यांवर, जेनेरिक औषधांवर पक्षाची जाहिरात केली. या बाबतीत प्रकाशित बातमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी त्यांच्या फेसबूक पेजवर भाष्य केले. ” पुढच्या काही दिवसांत भाजप अंत्यविधीसाठी लागणाऱ्या साहित्यावर पक्षाची जाहिरात करेल हे सांगता येत नाही” अशी टीका त्यांनी केली.
जेनेरिक औषधांच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाचा प्रचार केला जात आहे या आशयाचे वृत्त दैनिक लोकसत्तामध्ये प्रकाशित झाले. या बातमीचे कात्रण रोहित पवार यांनी त्यांच्या फेसबूकवर अपलोड केले व त्यावर आपली प्रतिक्रिया सुद्धा पोस्ट केली. त्यात रोहित पवार म्हणतात ” आता भाजपने भलेही खतांवर किंवा औषधांवर पक्षाची जाहिरात केली. तरी देशाला झालेला राजकीय आजार जनताच बरा केल्याशिवाय राहणार नाही. शिवाय पुढच्या काही दिवसांत अंत्यविधीच्या साहित्यावरही भाजपची जाहिरात दिसली तर आश्चर्य वाटणार नाही. “पवार यांनी भारतीय जन उर्वरक परियोजनेतील खतांच्या पिशवीचे छायाचित्र पोस्ट केले आहे.
हेही वाचा >>>नाथुराम हिंदू महासभाची घोषणा, संघभूमीतून निवडणूक….
सदर छायाचित्रात प्रधानमंत्री भारतीय जन उर्वरक परियोजनाच्या प्रथम अक्षराला जोडून त्याचेही संक्षिप्त रूप ‘पी.एम.-भा.ज.प.’ असे करण्यात आल्याचे दिसून येत आहे. योजनेच्या नावातील प्रथम अक्षरे ‘भा.ज. प.’ भगव्या रंगात स्वतंत्रपणे एकाखाली एक या पद्धतीने लिहिलेली आहेत. उर्वरित शब्द निळ्या रंगात आहे. त्यामुळे भगव्या रंगातील ‘भाजप’ हाच शब्द ठसठशीतपणे दिसून येतो. सध्या लोकसभा निवडणूक तोंडावर असल्याने या मुद्यावरून राजकारण पेटण्याची शक्यताही वर्तवली होती. दरम्यान रोहित पवार यांनी आता या मुद्यावर भाष्य केल्याने व काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनीही त्यावर भाष्य केल्याने आता हा मुद्दा पेटण्याची शक्यता आहे.