सोमवारपासून विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरूवात झाली असून काल अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा उर्जामंत्री देवेंद्र फडणवीस बोलत असताना अचानक वीज गेली. त्यामुळे सभागृहाचे कामकाज काही वेळासाठी तहकूब करण्यात आले होते. दरम्यान, यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी ट्वीट करत सरकारवर निशाणा साधला.
काय म्हणाले रोहित पवार?
“वीज गेल्यावर कशी अडचण होते, हे आज संपूर्ण सभागृहाला प्रत्यक्ष अनुभवता आलं आहे. खुद्द ऊर्जामंत्री बोलत असतानाच वीज गेल्याने बल्ब, माईक बंद पडून कामकाजही बंद पडलं. आपल्या बळीराजाला व छोट्या उद्योगांना तर मिनिटा-मिनिटाला विजेसाठी झुंजावं लागतं, यानिमित्त तरी सरकार त्याची दखल घेईल का?” अशी प्रतिक्रिया रोहित पवार यांनी दिली.
दरम्यान, पहिल्या दिवसाप्रमाणे कालही महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी बघायला मिळाली. तसेच महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नावर माजी मंत्री जयंत पाटील यांनी स्थगन प्रस्ताव मांडला होता. त्यावर बोलताना जयंत पाटील यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनाही खडेबोल सुनावले. “कर्नाटकला जर मस्ती चढली असेल, तर आपणही कोयना, वारणा आणि सातारा जिल्ह्यातील धरणांची उंची वाढवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. त्याशिवाय हे वठणीवर येणार नाहीत. महाराष्ट्राला वेठीस धरण्याचे काम होत असेल तर ते खपवून घेऊ नका,” असं जयंत पाटील यांनी राज्य सरकारला सांगितलं.