नागपूर: राज्यात तलाठी भरतीची पहिल्या टप्प्यातील परीक्षा सुरू आहे. यात पेपरफूट झाल्याचा दावा माध्यमांनी केला. तर पेपरफूट झालीच नाही, असे महसूल विभागाने स्पष्ट केले. मात्र या प्रकरणात नाशिकमध्ये पकडलेल्या उमेदवारांकडे प्रश्नपत्रिका सापडल्या आहेत. त्याचा अर्थ काय? असा सवाल केला जात आहे. या संपूर्ण प्रकरणावर राष्ट्रवादीचे युवा आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे.
हेही वाचा – २५ वर्षांपासून धावतेय ‘ज्ञानेश्वरी’! यासाठी होते विशेष आकर्षण; त्या भीषण काळ रात्रीचा..
रोहित पवार यांनी ट्विटरवर सांगितले की, “तलाठी भरतीच्या पहिल्याच दिवशी नागपूर आणि नाशिकमध्ये पेपर फुटल्याच्या घटना समोर आल्या. नोकरीच्या अपेक्षेने सामान्य कुटुंबातील मुलंमुली मोठ्या मेहनतीने अभ्यास करतात, परंतु शासनाच्या निष्काळजीपणामुळे पेपरफूट होते आणि या सर्व युवा वर्गाच्या स्वप्नांवर पाणी फिरवलं जातं. वन विभागाच्या परीक्षांचे पेपर फुटल्यावर अधिवेशनात आवाज उठवला असता गृहमंत्रीमहोदयांनी पेपर फुटल्याचा बातम्या खोट्या असल्याचं सांगत राज्याची दिशाभूल केली होती. त्यांनी तेव्हाच कणखर भूमिका घेतली असती तर आता पेपर फुटले नसते. युवांच्या प्रश्नांवर शासन दुर्लक्ष करणार असेल तर नाईलाजाने आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल आणि हा युवा वर्ग संतापला तर सरकारला खूप महाग पडेल. त्यामुळं पेपरफुटी होणार नाही याकडं शासनाने लक्ष द्यावे”.