नागपूर: राष्ट्रवादीचे (शरद पवार) युवा आमदार रोहित पवार यांच्या युवा संघर्ष यात्रेने नागपूरचे हिवाळी अधिवेशन दणाणून सोडले. विधानभवनाकडे जाणा-या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी बळाचा वापर केल्याने रोहित पवार संतापले. मात्र नंतर मुख्यमंत्र्यांकडूनच त्यांना चर्चेसाठी बोलावणे आले. हे कशामुळे घडले याची नागपूरच्या थंडीतही राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे.
नागपूर हिवाळी अधिवेशन नेहमीप्रमाणे यंदाही राजकीय घडामोडींमुळे चर्चेत आहे. मंगळवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, असे दिग्गज नेते नागपुरात होते. त्यामुळे दिवसभर राजकीय वातावरण तापले होते. त्यात रात्री आमदार रोहित पवार यांच्या यांच्या युवा संघर्ष यात्रेवर पोलिसांनी बळाचा वापर केल्याने भर पडली. रोहित यांना महत्त्व द्यायचे नाही म्हणून सत्ताधाऱ्यांनी मोर्चाक-यांकडे दुर्लक्ष केले, असा संदेश यातून गेला. पण रोहित पवार आक्रमक झाले.
हेही वाचा… अरे बापरे! केंद्र सरकारकडे शिष्यवृत्तीचे सोळाशे कोटी प्रलंबित; विद्यार्थी आर्थिक संकटात
पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर मात्र चित्र अचानक बदलले. ज्या सरकारने सुरूवातीला बळाचा वापर केला त्याच सरकारच्या प्रमुखाने म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रोहित पवार यांना चर्चेसाठी बोलावणे पाठवले. रोहित व त्यांचे सहकारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला गेले. यात नेमकी काय चर्चा झाली याचा तपशील समजला नाही. मात्र, मुख्यमंत्र्यांनी रोहित पवार याना भेटीला बोलवणे याचे अनेक राजकीय अर्थ काढले जात आहे.