भारत देश कृषीप्रधान आहे. कृषी पदवीधारकांना देशाची सेवा करण्याची मोठी संधी उपलब्ध असते. भारताच्या नवनिर्माणात कृषी पदवीधरांची भूमिका महत्त्वपूर्ण असून त्यांनी अथक परिश्रमातून आपले योगदान द्यावे, असे आवाहन राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा ३७ व्या दीक्षांत समारंभात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. दूरदृष्यप्रणालीद्वारे राज्यपालांनी सोहळ्यात सहभाग घेतला. भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे माजी उपमहासंचालक डॉ. नरेंद्रसिंह राठोर मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते. कुलगुरु डॉ. शरद गडाख, कुलसचिव डॉ. सुरेंद्र काळबांडे, विस्तार शिक्षण संचालक डॉ. धनराज उंदिरवाडे, शिक्षण संचालक डॉ.विलास खर्चे, कृषी अभियांत्रिकी अधिष्ठाता डॉ. सुधीर वडतकर, माजी कुलगुरु डॉ.विलास भाले, डॉ. व्यंकट मायंदे, डॉ.जी.एम. भराडे, विद्यापीठ कार्यकारी परिषद सदस्य आदी व्यासपीठावर प्रामुख्याने उपस्थित होते.
हेही वाचा >>>नागपूर: अल्पवयीन मुलीवर अत्याचार, प्रियकरावर बलात्काराचा गुन्हा
राज्यपाल पुढे म्हणाले, कृषी सेवा आणि शिक्षण नेहमीच फलदायी ठरले. कृषी क्षेत्रात व्यापक संधी आहेत. देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा कृषी क्षेत्र आहे. आपल्या संस्कृतीत कृषी क्षेत्र नेहमीच सर्वश्रेष्ठ मानण्यात आले. करोना काळात सर्व क्षेत्र बंद पडले असतांनाही केवळ कृषी हेच क्षेत्र अव्याहतपणे सुरू होते. नव्या पदवीधरांनी विद्येचा योग्य वापर करावा. कृषी विद्या क्षेत्रात महिलांनी चांगली प्रगती केली. त्यांच्या या क्षेत्रातील योगदानाचा नक्कीच देशाला फायदा होईल, असा विश्वास राज्यपालांनी व्यक्त केला. कृषी विद्यापीठांच्या संशोधनाला शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी पदवीधारकांनी, संशोधकांनी, विद्यापीठांनी प्रयत्न करावे. त्यासाठी आपली कृषी विज्ञान केंद्र सशक्त करण्याचा सल्लाही त्यांनी दिला.
हेही वाचा >>>वन्यजीव भुयारी मार्गाचे काम संथ गतीने, आता बघतोच! चक्क वाघोबांनी केली कामाची पाहणी; दोन दिवस बांधकामावर ठेवली पाळत!
संशोधन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी विस्तार कार्यात डिजीटल तंत्रज्ञानाचा अंतर्भाव करणे आवश्यक आहे, असे मत डॉ. नरेंद्र सिंह राठोर यांनी व्यक्त केले. कुलगुरु डॉ. गडाख यांनी विद्यापीठाच्या वाटचाली विषयी स्वागतपर भाषणात दिली. या सोहळ्यात कृषी विद्याशाखा, कृषी अभियांत्रिकी विद्याशाखा, तसेच पदव्युत्तर अभ्यासक्रम व आचार्य अशा एकूण ४३२७ पदव्यांचे पदवीदान करण्यात आले. ३० आचार्य पदवीधारक, २३ स्नातकोत्तर, तर १९२२ पदवीपूर्व पदवीधारक यांनी समारंभात उपस्थित राहून पदवी प्राप्त केली. त्याच प्रमाणे उत्कृष्ट संशोधक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनाही मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.