नागपूर : घराच्या छतावर सौरऊर्जा निर्मिती पॅनेल्स बसवून निर्माण वीज स्वतः वापरायची आणि जास्त वीज महावितरणला विकण्याच्या ‘रूफटॉप सोलर’, योजनेला ग्राहकांची पसंती मिळत आहे. २०१६- १७ मध्ये महावितरणच्या १०७४ ग्राहकांकडून राज्यात २० मेगावॅट सौरऊर्जा निर्मिती होत होती. २०२१- २२ मध्ये ही ग्राहकसंख्या ७६ हजार ८०८ होऊन सौर वीज निर्मिती १,३५९ मेगावॅटवर पोहोचली आहे.
राज्यात २०२१-२२ मध्ये ‘रूफटॉप सोलर’ योजनेतील सौरऊर्जा निर्मितीने एक हजार मेगावॅटचा टप्पा ओलांडला होता. गेल्या दहा महिन्यांत घरावर सौरऊर्जा निर्मिती संच बसविणाऱ्या ग्राहकांची संख्या २० हजार ७२२ ने वाढली. तर सौरऊर्जा निर्मिती क्षमता ३३१ मेगावॅटने वाढली. सौरऊर्जा निर्मितीसाठी रूफटॉप सोलर योजनेत ग्राहकांना केंद्र सरकारकडून मोठे अनुदान मिळते. तीन किलोवॅटपर्यंत क्षमतेचे पॅनेल बसविण्यासाठी सुमारे एक लाख वीस हजार खर्च येतो व त्यामध्ये अंदाजे ४८,००० रुपये म्हणजे चाळीस टक्के अनुदान मिळते. त्यामुळे, ग्राहकाला जवळपास ७२,००० रुपये खर्च येतो.
हेही वाचा – नागपूर : १२ वर्षीय मुलगा गळफास घेतलेल्या स्थितीत, क्वार्टर परिसरात खळबळ
सौरऊर्जेतून निर्माण होणाऱ्या वीजेमुळे ग्राहकाला नेहमीचा वीजपुरवठा कमी वापरावा लागतो व वीजबिलात कपात होते. ग्राहकाच्या सौर पॅनेलमधून त्याच्या वापरापेक्षा जास्त वीज निर्माण झाली, तर ती महावितरणच्या ग्रीडमध्ये पाठवली जाते व कंपनी त्या विजेच्या मोबदल्यात वीजबिलात सवलत देते. सौरऊर्जा निर्मितीसाठी ग्राहकांनी ३ किलोवॅट ते दहा किलोवॅट क्षमतेचे पॅनेल्स बसविले तर वीस टक्के अनुदान मिळते. घरगुती ग्राहकांना सुविधा हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे महावितरणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी सांगितले.