लोकसत्ता टीम
नागपूर: उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर जिल्ह्यात रुफटाॅप सोलर योजनेला ग्राहकांची पसंती मिळत आहे. महावितरणच्या नागपूर परिमंडळात या योजनेत ५ हजार ८३१ ग्राहक सहभागी झाले असून त्यांच्या व्दारे ६६ मेगावॅटपर्यत वीज निर्मिर्ती होते.
रूफ टॉप योजनेत ग्राहकांना केंद्र सरकारकडून अनुदान मिळत असल्याने योजनेतील ग्राहक संख्या दिवसेंगणीत वाढत आहे. लवकरच ही संख्या सहा हजाराचा आकडा पार करणार आहे. योजनेत घरगुती ग्राहकांना १ ते ३ किलोवॅटपर्यंत ४० टक्के, ३ किलोवॅटपेक्षा अधिक ते १० किलोवॅटपर्यंत २० टक्के अनुदान सरकार देते.
हेही वाचा… निकाल मान्य, पण नार्वेकर जे करणार… काँग्रेसचे आमदार स्पष्टच बोलले
सामूहिक वापरासाठी ५०० किलोवॅटपर्यंत प्रत्येकघरासाठी १० किलोवॅट मर्यादेसह गृहनिर्माण संस्था व निवासी ग्राहकांना २० टक्के अनुदान दिले जाते. सौरऊर्जेतून निर्माण होणाऱ्या वीजेमुळे ग्राहकाला नेहमीचा वीजपुरवठा कमी वापरावा लागतो व वीजबिलात कपात होते. ग्राहकाच्या सौर पॅनेलमधून त्याच्या वापरापेक्षा जास्त वीज निर्माण झाली तर ती महावितरणच्या ग्रीडमध्ये पाठवली जाते व कंपनी त्या विजेच्या मोबदल्यात वीजबिलात सवलत देते. यातून कधी कधी ग्राहकांना शून्य रकमेचे वीजदेयकही येते, अशी माहिती नागपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके यांनी दिली.