नागपूर : जंगलाकडे वळणाऱ्या पर्यटकांच्या वाहनांची संख्या वाढत असतानाच आता ‘रोप -वे’ पर्यटनाच्या माध्यमातून पर्यटकांना जंगलाकडे वळवण्याचा विचार राज्य सरकार करत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात एका कार्यक्रमादरम्यान रोप-वे पर्यटनाच्या माध्यमातून पर्यटकांना वन्यजीव पर्यटनाचा अनुभव देण्याचा प्रस्ताव असल्याचे सांगितले.
फ्रान्समधील पोमा रोपवेज या कंपनीने ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाबाबत शासनाला हवाई पर्यटनासंदर्भात पत्र दिले आहे. या पत्रात वन्यप्राण्यांना कोणताही त्रास न देता हवाई पर्यटनाच्या माध्यमातून वन्यजीव पर्यटनाचा अनुभव पर्यटकांना देण्याचा प्रस्ताव असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रस्तावावर पर्यटन विभाग आणि वनविभाग दोघेही अभ्यास करणार असून लवकरच हवाई पर्यटनाच्या माध्यमातून लोकांना वन्यजीव पर्यटन उपलब्ध करून देण्याच्या दिशेने वाटचाल करणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
हे ही वाचा… नागपूर : धक्कादायक! प्रेयसीच्या चारित्र्यावर संशय; मित्राला घराच्या छतावरून फेकले…
ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पत राज्यातीलच नाही तर देशविदेशातील पर्यटकांचा ओढा आहे. मोठ्या संख्येने पर्यटक याठिकाणी येतात. यात ‘सेलिब्रिटी’ पर्यटकांचा देखील समावेश आहे. कारण ताडोबातील वाघ पर्यटकांना कधीच निराश करत नाहीत, हाच आजवरचा अनुभव आहे. आधी केवळ गाभा क्षेत्रातच पर्यटनासाठी पर्यटकांची गर्दी असायची. आता मात्र बफर क्षेत्रातही सहज व्याघ्रदर्शन होत असल्याने आणि गाभापेक्षाही बफर क्षेत्रातील वाघ पर्यटकांना खुणावत असल्याने पर्यटकांचा ओढा या व्याघ्रप्रकल्पाकडे अधिक आहे.
त्यामुळेच कदाचित या हवाई पर्यटनासाठी ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाची निवड करण्यात आली असावी. ताडोबा प्रशासन मात्र याबाबत अजून पूर्णपणे अनभिज्ञ आहे. हा प्रस्ताव अजून शासनस्तरावरच असावा, ताडोबा व्यवस्थापनाला अजून याबाबत काहीही माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, ही संकल्पना चांगली असली तरीही मानव-वन्यजीव संघर्ष वाढीला जंगलालगत येणाऱ्या प्रकल्पांसोबतच कुठेतरी वाढलेले अतिपर्यटन देखील कारणीभूत ठरत आहे.
हे ही वाचा… अकोल्यात दोन गटात वाद; दगडफेक, वाहनांची जाळपोळ
बऱ्याच वर्षांपूर्वी मानव आणि वन्यजीव यांच्यात सहजीवन होते. वाघाने माणसांवर हल्ला केल्याचा, वाघ गावात शिरल्याच्या घटना ऐकायला येत नव्हत्या. मात्र, जंगलातील पर्यटनाची चाके वेगाने धावू लागली आणि वाघच काय तर इतरही वन्यप्राणी बाहेर पडायला लागले. जंगलाच्या तुलनेत वन्यप्राण्यांची संख्या वाढल्याची कारणे देण्यात येत असली तरीही वन्यप्राण्यांना अति पर्यटनामुळे त्यांचाच अधिवास कमी पडायला लागला आहे, हेही तेवढेच खरे आहे.
त्यामुळे विदेशाच्या धर्तीवर हा प्रयोग राबवण्याचा विचार शासन करत असेल तर पर्यटनावर नियंत्रणही विदेशाच्या धर्तीवरच हवे. यासंदर्भात अजून प्रस्तावच तयार झाला असला तरीही वन्यप्राणी संरक्षणावर त्याचा विपरित परिणाम होण्याची शक्यताही नाकारता येत नाही.